संभाजीनगर – महिलांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक स्थळांवर बसवणार सीसीटीव्ही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील थरकाप उडविणाऱ्या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया सेफ सिटी’ योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात 1100 कॅमेरे बसविण्यात येणार असून, गर्दीच्या ठिकाणांसह निर्जनस्थळीदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शंभर फिरते कॅमेरेही कार्यरत राहणार आहेत.

हैदराबादेत एका डॉक्टर तरुणीच्या बलात्कारानंतर तिला पेटवून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेची शहरात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलाला विशेष खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. राज्यात महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया सेफ सिटी’ या नावाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील 11 शहरांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. संवेदनशील असलेल्या संभाजीनगरातही हा उपक्रम राबविण्यासाठी पोलीस आयुक्तालय सरसावले आहे. शहरात तरुणी व महिलांबाबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी 1100 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मॉल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, निर्जनस्थळी, गर्दीचे ठिकाण, सिनेमागृह, महिला कल्ब आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्तालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यानां विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात येणार आहे. यात दामिनी पथक, पीसीआर मोबाईल कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. अशा आशयाचा प्रस्ताव चार दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले.

सिटीबस, ओला, कॅबमध्येदेखील कॅमेरे
महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यापाठोपाठ महिला व तरुणींची छेडछाड रोखण्यासाठी सिटीबस, ओला, कॅब आणि रिक्षामध्येदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कॅमेऱ्याचे कंट्रोल थेट पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यात येणार आहे.

शंभर फिरते वेब कॅमेरे
गर्दीच्या ठिकाण, वाहनापाठोपाठ पोलीस दलातर्फे शंभर फिरते कॅमेरेदेखील लावण्यात येणार आहे. वाहनांवर हे फिरते कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच कॅमेऱ्यांपाठोपाठ गर्दीच्या ठिकाणी आणि मॉल व बाजारपेठेत अलार्मही लावण्यात येणार असून, मुली व तरुणींच्या छेडीची घटना घडली तर अलार्म वाजविता येईल, त्याचा थेट पोलीस मुख्यालयाशी संपर्क राहणार आहे.

वेब कॅमेऱ्याने सज्ज दामिनी पथक
महाविद्यालय, खासगी शिकवणीच्या ठिकाणी तरुणींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी आता दामिनी पथकातील महिला कर्मचारी कॉलर व शर्टमध्ये वेब कॅमेरे बसवून टवाळखोरांवर लक्ष ठेवणार आहेत.