
मध्य रेल्वे ठाकुर्ली स्थानकात बुधवारी 25 डिसेंबर रोजी घेण्यात आलेला पॉवर ब्लॉक आता संपला असून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलासाठी सहा मीटर रुंदीचे चार गर्डर टाकण्यासाठी बुधवारी कल्याण ते डोंबिवलीदरम्यान सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 असा चार तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात आला.
डोंबिवली ते कल्याणदरम्यान अप-डाऊन जलद, धीमा मार्ग आणि 5-6 व्या रेल्वे लाइनवर स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 वाजेपर्यत रस्त्यावरील चारशे मेट्रिक टन क्षमतेच्या अजस्र क्रेनद्वारे चार गर्डर टाकले गेले. ऐन नाताळच्या दिवशी असा ब्लॉक घेतल्याने आणि ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाल्याने डोंबिवली स्थानकात गोंधळ झाला होता. ट्रेन वेळापत्रक कोलमडल्यामुळे डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. काही प्रवाशांनी स्टेशन प्रबंधक कार्यालयातही गोंधळ घातला. तर दिवा स्थानकातही प्रवाशांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर हा ब्लॉक संपला असून गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे.
























































