
>> पंढरीनाथ सावंत
अलीकडे सरकारतर्फे असे सांगण्यात आले की,स्त्री अत्याचाराच्या गुन्हय़ांसाठी देशात 700 फास्ट ट्रक न्यायालये आहेत. सरकार बलात्कार प्रकरणे आणि पोक्सो केसेस (मुलांवरील लैंगिक अत्याचारविषयक प्रकरणे) यासाठी लवकरच 1हजार 123 डेडिकेटेड – स्वतंत्र न्यायालये निर्माण करणार आहेत. ती स्थापन होण्याची वाट पाहूया. वास्तविक आपण ज्यांना फास्ट ट्रक समजतो ती वेगळी न्यायालये नसतात. सध्याच्याच अस्तित्वात असलेल्या न्यायालयीन व्यवस्थेवर पडणारा तो अतिरिक्त भार म्हणावा लागेल. त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांसंदर्भात स्वतंत्र, डेडिकेटेड न्यायालयांची खरोखर गरज आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पक्षाचा निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगर याला दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाय 25 लाख रुपये दंड ठोठावला असून ती रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाला अतिरिक्त नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही कोर्टाने दिला.
2017 साली हा गुन्हा घडला त्या वेळी बलात्काराच्या गुन्हय़ाला मृत्युदंड देण्याची तरतूद नव्हती हे लक्षात घेऊन त्याला फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली नाही. कुलदीपसिंह सेंगर व त्याच्या साथीदारांनी उन्नाव येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर तिच्यावर ट्रक घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात तिच्या कुटुंबातील दोन स्त्र्ाया ठार झाल्या. पीडिता बचावली. नंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात ती गंभीररीत्या भाजली. उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. यात बलात्कार करण्याच्या गुन्हय़ात त्याचे जे साथीदार होते त्यांचे काय झाले किंवा होणार हे समजण्यास वाव नाही.
त्यानिमित्ताने देशामधील बलात्कार या विषयाशी संबंधित काही फक्त मुद्दे येथे नमूद करीत आहे.
नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्यूरोच्या (एनसीआरबी)अहवालानुसार 2017 या एका वर्षात –
- बलात्काराचे 33,885 गुन्हे झाले.
- त्यापैकी 227 पीडितांना बलात्कारानंतर ठार करण्यात आले.
- 28,152 मुलांवर बलात्कार करण्यात आले.
- त्यापैकी 151 मुलांना बलात्कार केल्यानंतर ठार करण्यात आले.
- बलात्कार प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचे प्रमाण 86.6 टक्के.
- 2013 साली चार्जशीट दाखल करण्याचे प्रमाण 95.4 टक्के होते ते घसरले.
- दोषी ठरल्याचे प्रमाण 32.2 टक्के.
यानिमित्ताने कारवाईच्या संबंधात अत्यंत जबाबदार अशा व्यक्ती काय म्हणतात?
रेल्वेच्या इन्स्पेक्टर जनरल पदावर असलेल्या आणि पूर्वी तुरुंगाच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल असलेल्या रूपा सौंदगले मान्य करतात, ‘‘ग्रामीण भागात बलात्काराचे प्रकरण फाइल करणे आव्हान असते.’’ पीडितांना हाकलून लावण्याची उदाहरणे आहेत. पोलीस तक्रारदारावरच आरोप करतात. अनेक प्रसंगी सर्व्हायवरचे म्हणजे बचावलेल्यांचे जबाब नमूद करताना महिला अधिकारी हजर ठेवण्याचा नियम पाळला जात नाही.
2018 साली राजधानी दिल्लीमध्ये बलात्काराचे दररोज सरासरी 5 किंवा जास्त गुन्हे होत होते असे पोलीस रेकॉर्ड सांगते. बलात्कार पुष्कळ अगोदर झाला असल्यास त्या घटनेचे रिपोर्टिंग आणि तपास या गोष्टी अवघड होतात. कारण अत्यंत महत्त्वाचा बायोलॉजिक (शारीरिक) पुरावा गमावलेला असतो. सीसी टीव्ही आणि कॉल डिटेल रेकॉर्ड याचे विश्लेषण अवघड किंवा अशक्य असते. व्हिजिटर म्हणजे भेट देणाऱयाचे लॉग्ज भलतीकडे ठेवलेले असतात.
अनेक प्रकरणांत ढिलाई प्रकाशात येत नाही. कारण देखरेख करणारा अधिकारी लक्ष देत नाही. परंतु बंदोबस्त, व्हीआयपींच्या अंगरक्षणाचे काम यासारखी कारणे असतात व बहुतांशी ती खरी असतात. म्हणून डेडिकेटेड म्हणजे फक्त याच कामासाठी नेमलेले लोक असायला हवेत.
पोलीस स्टेशनातील फळय़ावर उलगडा केलेल्या प्रकरणाची यादी असते, पण त्यात बलात्काराचे प्रकरण असते. खुनाच्या गुन्हय़ाची उकल केली की बढती मिळते. बलात्काराचे प्रकरण उलगडल्यास हा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांकडे ‘जास्तीचे ओझे’ म्हणून पाहिले जाते.
उन्नाव प्रकरणी पीडिता तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेली त्यावेळी त्यांनी तशी नोंद केली नाही. त्यासाठी तिला कोर्टाकडे धाव घ्यावी लागली.
पुरावा जमवल्यानंतर त्याचे जतन करणे महत्त्वाचे असते, पण बहुधा त्याचा अभाव दिसतो. कित्येकदा फोरेंसिक पुरावा टिकत नाही, कारण पुराव्याचे जतन मार्गदर्शक तत्त्वानुसार केलेले नसते. वास्तविक असा पुरावा गोळा करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची गरज असते. सरकारी हॉस्पिटलमधला आधीच ओझ्याखाली दबलेला कर्मचारी वर्ग त्यासाठी सज्ज नसतो.
डीएनए तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. पण हिंदुस्थानात दरसाल फक्त 7500 डीएनए तपासले जातात. ब्रिटनची लोकसंख्या हिंदुस्थानच्या मानाने फारच लहान, पण तिथे दरसाल 60,000 डीएनए टेस्ट होतात.
चार्जशीट 60 दिवसांच्या आत दाखल केले पाहिजे असा नियम आहे. पोलीस तसे करीत नाहीत. परिणामी आरोपींना जामीन मिळतो.
फास्ट ट्रक कोर्ट – दिल्लीमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्राने राज्य सरकारांना कळवले की, लैंगिक गुन्ह्याप्रकरणी फास्ट ट्रक करावी म्हणजे वेगाने चालवावी. खटला 50 दिवसांमध्ये पूर्ण झाला पाहिजे, परंतु आपण फास्ट ट्रक म्हणतो त्यावेळी ते वेगळे बांधलेले कोर्ट नसते. ते अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेला जास्तीचे ओझे असते. दिल्लीत सामूहिक बलात्कारप्रकरणी माध्यमे जोरजोरात शंख करीत असतानासुद्धा एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला.
अलीकडे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, अशा गुन्हय़ांसाठी 700 फास्ट ट्रक न्यायालये आहेत. सरकार बलात्कार प्रकरणे आणि पोक्सो केसेस (मुलांवरील लैंगिक अत्याचारविषयक प्रकरणे) यासाठी लवकरच 1123 डेडिकेटेड – स्वतंत्र न्यायालये निर्माण करणार आहेत.
ती स्थापन होण्याची वाट पाहूया.
तसे बघायला गेले तर याबाबतीत आपण प्रगत राष्ट्रांच्या याबाबतीत सुद्धा मागे आहोत. हिंदुस्थानच्या एखाद् दोन जिल्हय़ाएवढा किंवा एखादा भाग एवढा आकार असलेली राष्ट्रेसुद्धा या बाबतीत आपल्या खूप पुढे आहेत. त्यामध्ये पहिला नंबर आहे दक्षिण आफ्रिकेचा. प्रत्येक 100000 (एक लाख) लोकसंख्येमागे 132.4 लाखांत स्वीडनचा क्रमांक 6 वा आहे. तिथे 1 लाख लोकसंख्येमागे 63.5 टक्के घटना घडतात. अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलॅण्ड यांचाही नंबर आपल्यापेक्षा वरचा आहे. तरीही आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत.






























































