CAA हिंसाचार – एएमयूच्या 10 हजार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारप्रकरणी योगी सरकारने आता कारवाईला सुरुवात केली आहे. या हिंसाचार प्रकरणी अलीगड मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) 10 हजार अनोळखी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलीगड मुस्लीम विद्यापीठात 15 डिसेंबरला करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्यात काही पोलीस जखमी झाले होते. तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. त्यात उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला होता. त्याची योगी सरकारने दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. हिंसाचार पसरवणाऱ्या आरोपींचा माग काढून त्यांना अटक करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. एएमयूमध्ये विद्यार्थ्यांनी 15 डिसेंबरला आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला अचानक हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनादरम्यान समाजकंटकांनी विद्यापीठाचे प्रवेशद्वारही तोडले होते. त्यावरून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला होता. तसेच प्रवेशद्वार तोडण्यावरून आरोप- प्रत्यारोपही करण्यात आले होते.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आंदोलनाला हिंसक स्वरूप आल्याचा आरोप विद्यार्थी संघाने केला आहे. तर विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान दगडफेक केल्याने त्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून शांततेचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलिसांनी हिसाचार पसरवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. जनतेने कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.