
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करून वारकरी भाविकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. हीच एकजूट आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या रुपाने व संघटनेच्या रूपाने दाखवूया, असे प्रतिपादन हभप विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी आठव्या वारकरी संप्रदाय मेळाव्यात बोलताना केले. कसाल गांगोचिराई मठ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय मेळावा व संत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी कसाल हायस्कूल ते कुंभारवाडी गांगोचिराई मठ असे वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वारकरी भाविक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या गजरात पूर्ण कसाल गाव भक्तीभावाने रंगून गेला होता.
या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कसाल गावचे सरपंच संगीता परब यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पारधिये, सावळाराम कुर्ले, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा तालुका प्रमुख बाळा कोरगावकर तसेच कसाल गावचे वारकरी संप्रदाय मंडळाचे सत्यवान कोंडस्कर आदींसह मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचे अनुयायी उपस्थित होते.
प्रस्तावनेत यशवंत परब म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. त्यामुळे हरी नामाची गोडी मानवामध्ये निर्माण होऊन हरिनामाकडे मानव वळू लागला आहे. संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य राजकारणी किंवा इतर कोणामध्येही नाही. ही तर केवळ सतांमध्येच आहे. संत शक्ती कोणतेही कार्य करू शकते, हे आणि हीच शक्ती राष्ट्राचे रक्षण आणि धर्म जागृतीचे रक्षण करू शकते असे परब यांनी सांगितले.





























































