
नवे वर्ष जसे संकल्पाचे असते तसे जुने वर्ष बरेच काही शिकवणारे असते. मित्राशी अहंकाराने वागू नये, दिलेला शब्द मोडू नये, अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये अशा अनेक गोष्टी मावळत्या वर्षाने शिकवल्या. 2019 हे वर्ष संपत असताना देशाची मरणासन्न अवस्थेत गेलेली अर्थव्यवस्था मात्र चिंता वाढवणारी आहे. 2020 या नव्या वर्षाच्या पोटात काय दडले आहे हे तर येणारा काळच सांगेल पण ‘ट्वेंटी-ट्वेंटी’च्या पहिल्या अरुणोदयाचे आणि त्याच्या नवकिरणांचे स्वागत करायलाच हवे!
उद्या 31 डिसेंबर. मावळत्या वर्षाचा अखेरचा दिवस. थर्टी फर्स्टची मध्यरात्र म्हणजे आता जणू आंतरराष्ट्रीय सणच झाला आहे. या सणाच्या माध्यमातून सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची जय्यत तयारी एव्हाना जगभरात झाली असेल. डोळे दीपवून टाकणारी रोषणाई व आसमंत उजळून टाकणाऱया नयनरम्य आतषबाजीने देशविदेशात नव्या वर्षाचे दिमाखदार स्वागत केले जाईल. मेजवान्या झडतील, केक कापले जातील, संगीताच्या तालावर तरुणाई थिरकू लागेल. हा सगळाच उत्साह, आनंद आणि हर्षोल्हास बघण्यासारखा असतो. तो आनंद लुटलाही पाहिजे आणि लुटूही दिला पाहिजे. नाही तरी सामान्य जनतेच्या आयुष्यात आनंदाचे म्हणावे असे किती क्षण येतात? पुन्हा सदैव त्याच त्या कटू स्मृती आणि दुःखं उगाळत बसण्यात तरी काय हशील? त्यामुळेच तर सामान्य माणूस मौजमजा करण्यासाठी संधी शोधत असतो. त्याच्या या आनंदावर, उत्साहावर नाके मुरडून विरजण घालण्याचा कद्रूपणा तरी कोणी का करावा? जुन्या आणि नव्या वर्षात तसे पाहिले तर फक्त एका रात्रीचेच तेवढे अंतर. पण आदल्या दिवशीचा अखेरचा सूर्यास्त आणि नवीन वर्षातील पहिला सूर्योदय यातील रात्रीत सामर्थ्य असते ते काळ बदलण्याचे. युगानुयुगे, अनादी काळापासून वर्षांमागून वर्षे अशीच सरत आहेत आणि भिंतीवरची दिनदर्शिका बदलून कोणासाठीही न थांबणारा काळ पुढे पुढे सरकतो आहे. तथापि पुढे सरकणाऱया काळाबरोबरच भविष्याचा वेध घेऊन ठोस संकल्प करणे आणि ते सिद्धीस नेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. येणारे 2020 हे वर्ष माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची प्रकर्षाने आठवण करून देणारे आहे.
जगातील विकसित देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची सर्वच क्षेत्रांतील पीछेहाट पाहून मिसाईलमॅन कलाम यांनी ‘इंडिया 2020ःव्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ हे पुस्तक 1998 साली लिहिले होते. वीस वर्षांनंतरचा हिंदुस्थान कसा असावा आणि या वीस वर्षांत देशातील विविध क्षेत्रांत कोणकोणते बदल होणे आवश्यक आहे याचा लेखाजोखाच डॉ. कलाम यांनी अत्यंत दूरदर्शीपणे आपल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये मांडला होता. हा हा म्हणता वीस वर्षे सरली, पण कलामांनी पाहिलेला स्वप्नातील हिंदुस्थान आपण घडवू शकलो का हा चिंतनाचाच विषय आहे. मावळत्या वर्षाचे सिंहावलोकन करायचे म्हटले तर अनेक बऱयावाईट गोष्टी डोळय़ासमोर येतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड या तीन भाजपशासित राज्यातील सत्ता जनतेने उलथवून टाकल्यानंतर 2019 मध्ये भाजप आणि नरेंद्र मोदींना दुसरी टर्म मिळणे अवघड जाईल असाच सगळा माहोल होता. मात्र पुलवामात सीआरपीएफच्या 40 जवानांचे हत्याकांड घडले आणि एका रात्रीत वातावरण बदलले. पूर्वीपेक्षाही अधिक जागा जिंकून भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. सरकारकडे पाशवी बहुमत आणि विरोधक क्षीण असे चित्र मधल्या काळात दिल्लीत निर्माण झाले होते. मात्र वर्ष सरता सरता आधी महाराष्ट्र आणि नंतर झारखंडमधून भाजपचे उच्चाटन झाले. ‘मी सांगेन तीच पूर्व दिशा’ अशी उन्मत्त भूमिका घेणाऱया सत्ताधीशांना कसे शिंगावर घ्यायचे याचा राजमार्ग महाराष्ट्राने देशाला दाखवून दिला.
नवे वर्ष जसे संकल्पाचे असते तसे जुने वर्ष बरेच काही शिकवणारे असते. मित्राशी अहंकाराने वागू नये, दिलेला शब्द मोडू नये, अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये अशा अनेक गोष्टी मावळत्या वर्षाने शिकवल्या. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स इत्यादी सरकारी संस्थांचा गैरवापर करून सरकारे स्थापन करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात अपयशी ठरला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच झटक्यात 2 लाखांपर्यंतचे शेतकऱयांचे कर्ज माफ केले. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय व राममंदिराच्या बाजूने आलेला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हे दोन्ही प्रलंबित विषय याच वर्षात मार्गी लागले. सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासारखे संसदपटू देशाने गमावले. मनोहर पर्रीकर, शीला दीक्षित, राम जेठमलानी, टी. एन. शेषन या दिग्गजांनीही याच वर्षात जगाचा निरोप घेतला. ‘चांद्रयान-2’ मोहिमेला आलेले अपयश याच वर्षातले. 2019 हे वर्ष संपत असताना देशाची मरणासन्न अवस्थेत गेलेली अर्थव्यवस्था मात्र चिंता वाढवणारी आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारीने कळस गाठला आहे. तथापि कोमातील अर्थव्यवस्थेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘एनआरसी’सारखे तेढ निर्माण करणारे भावनिक विषय पुढे रेटले जात आहेत. 2020 या नव्या वर्षाच्या पोटात काय दडले आहे हे तर येणारा काळच सांगेल पण ‘ट्वेंटी-ट्वेंटी’च्या पहिल्या अरुणोदयाचे आणि त्याच्या नवकिरणांचे स्वागत करायलाच हवे!































































