पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांशी गळाभेट, हिंदुस्थानी लष्कर हाय अलर्टवर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर नियंत्रणरेषेवरही पाकिस्तान सैन्य सपाटून मार खात आहे. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आता छुप्या युद्धातील मोहरे असलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची भेट घेऊन हिंदुस्थानविरोधात कारवाया करण्यासाठी कट रचत आहेत. पाकिस्तानी अधिकारी आणि दहशतवाद्यांमधील सुरू असलेल्या खलबतांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कराला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी नुकतीच कराचीतील कुख्यात जामिया रशिदिया मदरशाला भेट दिली. जामिया मशिदीचा संबंध ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि दहशतवादी सय्यद सलाउद्दीन याच्याशी आहे. गफूर यांचे मदरशांमधील मुलांबरोबरचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत, मात्र त्याबद्दल गफूर यांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानी बॉर्डर रेंजर्सच्या अनेक अधिकार्‍यानी ‘सुन्नत वल जमात’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख औरंगजेब फारुकी याची भेट घेतली. ‘जमात’ कुख्यात ‘सिपाह-ए-सहाबा’ या संघटनेसाठी काम करते. पाकिस्तानमधील शेकडो शिया पंथीयांच्या हत्येमागे ‘सहाबा’चा हात आहे. या संघटनेवर दोनदा बंदी घालण्यात आली. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी प्राधिकरणाच्या यादीतही जामिया मदरसा  आणि अहले सुन्नत वल जमात यांचा समावेश आहे. तरीही पाकिस्तानी सैन्य आणि दशतवादी संघटना व त्यांच्या म्होरक्यांच्या गाठीभेटी सुरूच आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हिंदुस्थानने लष्कराला हाय अलर्ट दिला आहे.

‘जामिया’ दहशतवाद्यांचा अड्डा: अमेरिकन पत्रकाराच्या हत्येशी संबंध 

कराचीतील जामिया रशिदिया मदरशाचा संबंध अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येशी आहे. कराचीमधून 2002 मध्ये पर्ल यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. पर्ल यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जामियापासून 500 कोसांवरील अल रशीद ट्रस्टच्या जमिनीत दफन करण्यात आला होता. या मदरशाचा संबंध ‘अल कायदा’, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ यांच्याशी आहे.