जेएनपीटी बंदराची सुरक्षा रामभरोसे; सीसीटिव्ही कॅमेरे बंद 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाला सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी वेळ मिळत नसल्याने बंदर परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामूळे या परिसरात अवैध धंदे, भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संभाव्य संकट टाळण्यासाठी आणि बंदर परिसराच्या सुरक्षतेसाठी जेएनपीटी बंदर व्यवस्थापनाने बंद पडलेले सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे यांनी केली आहे.

जेएनपीटी बंदरातून देश-परदेशात मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात केली जाते. तसेच हे बंदर मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असल्याने या परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाने लाखो रुपये खर्च करून चांदणी चौकसारख्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. बंदरातील व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे. तरी बंदर व्यवस्थापनाने बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. याबाबत जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापकीय मुख्य अधिकारी जयवंत ढवळे यांना विचारले असता त्यांना त्यांनी बोलण्यास नकार दिला.