रत्नागिरी शिवसेनेचीच! नगराध्यक्षपदी प्रदीप साळवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांचा 1 हजार 182 मतांनी विजय झाला. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपच्या नेत्यांची फौज आली होती. शिवसैनिकांनी एकजुटीने काम करत भाजपला इंगा दाखवत रत्नागिरी शिवसेनेचीच असल्याचे दाखवून दिले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रविवारी शहरात 47.38 टक्के मतदान झाले. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या प्रदीप साळवी यांनी 652 मतांनी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत प्रदीप साळवींनी 1,152 मतांची आघाडी घेतली. तिसर्‍या आणि चौथ्या फेरीत भाजपचे उमेदवार डॉ. दीपक पटवर्धन यांनी अनुक्रमे 845 आणि 314 मतांची आघाडी घेतली. प्रदीप साळवी यांनी शेवटच्या फेरीत 470 मतांची आघाडी घेत 1,182 मतांनी विजय मिळवला.

शिवसेनेचे उमेदवार प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी  10 हजार 7 मते मिळाली. भाजपचे उमेदवार डॉ. दीपक पटवर्धन 8 हजार 825  मते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद कीर 8 हजार 252 मते आणि मनसेचे उमेदवार रूपेश सावंत यांना 419 मते मिळाली आहेत. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला शहर संघटक मनीषा बामणे, संघटक प्रसाद सावंत, नगरसेवक रोशन फाळके, विकास पाटील, सुहेल मुकादम, प्रशांत साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडीत भाजपचा नगराध्यक्ष

सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संजू परब 313 मतांनी विजयी झाले. संजू परब यांना  4481 मते, शिवसेनेच्या  खेमराज कुडतरकर यांना 4168 मते मिळाली, तर काँग्रेसच्या दिलीप नार्वेकर यांना 674 मते मिळाली. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांना 578 मते, बबन साळगावकर यांना 309 मते मिळाली, अमोल साटेलकर यांना 53 मते मिळाली. 46 जणांनी नोटाचा पर्याय निवडला. येथील जिमखाना मैदान हॉलजवळ निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

धरणगाव नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नीलेश चौधरी विजयी

धरणगाव नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झाले होते. आज मतमोजणी होऊन शिवसेनेच्या नीलेश चौधरी यांची नगराध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे यांचा पराभव झाला. रोकडे यांना 6060 मते मिळाली.

आज धरणगाव येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. स्व. सलीम यांच्या कारकीर्दीत झालेल्या विकासकामांनी आणि आमदार गुलाबराव पाटील आणि जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. शिवसेनेचे उमेदवार नीलेश सुरेश चौधरी यांना 10012 मते तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार मधुकर रोकडे यांना 6060 मते मिळाली आहेत. विजयी उमेदवार 3952 मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले.