नव्या वर्षात लांबपल्ल्याचा प्रवास महागला, उपनगरीय लोकल  प्रवास भाडे ‘जैसे थे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे बोर्डाने अखेर नवीन वर्षांपासून प्रवाशांचा खिसा कापला आहे. लांबपल्ल्याच्या प्रवासी भाड्यात दर किलोमीटरमागे 1 ते 4 पैसे  वाढ करण्यात आली आहे. या भाडेवाढीतून उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना वगळण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी लांबचा प्रवास करणार्‍यांचे वांदे होणार आहेत. सर्वसाधारण गाड्यांच्या नॉन एसी डब्यासाठी दर किलोमीटरमागे 1 पैसे तर मेल-एक्स्प्रेस नॉन एसी डब्यांसाठी दर किलोमीटर मागे 2 पैसे अशी दरवाढ करण्यात आली आहे. ज्यांनी 1 जानेवारीपूर्वी आरक्षण केले असेल त्यांना ही दरवाढ लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही भाडेवाढ दर किलोमीटर पैसे स्वरूपात दर्शविल्याने कमी वाटत असली तरी अंतराचा विचार करता लांबपल्ल्याच्या भाड्यात घसघशीत वाढ झाल्याने शताब्दी, राजधानी, दुरांतोच्या दरात वाढ होऊन ऐन महागाईत भडका उडणार आहे.  रेल्वे प्रशासनाने याआधी 2014-15 मध्ये रेल्वेचे भाडे वाढविले होते. आता रेल्वेच्या भाड्यात चार वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यात दररोजचा प्रवास करणार्‍या उपनगरीय प्रवाशांना वगळण्यात आले आहे. त्यात रोजचे तिकीट काढून प्रवास करणारे आणि लोकलच्या पासधारकांचा समावेश आहे. त्यांची संख्या एकूण प्रवाशांच्या 66 टक्के इतकी आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण तसेच प्रवासी सुविधांचा विस्तार, लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या डब्यांमध्ये झालेले बदल आणि स्थानकांतील प्रवासी सुविधांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच सातव्या वेतन आयोगामुळे रेल्वेवर आलेला भार पाहून ही भाडेवाढ करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. गेल्या वर्षी संसदेच्या एका समितीने निश्चित कालावधीसाठी रेल्वे भाड्याचा आढावा घेण्याची शिफारस केली होती. त्यानुसार बेस फेअरमध्ये वाढ करण्यात आली आहे.

राजधानीच्या भाड्यात 55 ते 58 रुपयांची वाढ

लांबपल्ल्याच्या दरात वाढ झाल्याने जितके जादा अंतर तितके भाडे वाढणार आहे. दिल्ली-कोलकाता राजधानी एक्सप्रेस रेल्वे मार्गाचे अंतर 1,447 किलोमीटर इतके आहे. या श्रेणीत 4 पैसे प्रति किलोमीटर वाढ झाली आहे. म्हणजे  58 रुपयांची वाढ झाली आहे.

सामान्य नॉन एसी – नॉन सबर्बन        कि.मी.भाडेवाढ

सेकंड क्लास सामान्य श्रेणी                 1 पैसे

स्लीपर क्लास सामान्य श्रेणी               1 पैसे

फर्स्ट क्लास सामान्य श्रेणी                  1 पैसे

मेल-एक्स्प्रेस नॉन एसी

सेकंड क्लास (मेल-एक्सप्रेस)               2 पैसे

स्लीपर क्लास (मेल-एक्सप्रेस)             2 पैसे

फर्स्ट क्लास  (मेल-एक्सप्रेस)               2 पैसे

एसी क्लासेस

एसी चेअर कार                                4 पैसे

एसी 3-टीयर/3-ई                             4 पैसे

एसी 2-टीयर                                   4 पैसे

एसी फर्स्ट क्लास/ईसी/ईए                     4 पैसे