
नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी नव्या महाराष्ट्राच्या व्हिजनबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर जी यांच्यासोबत नव्या महाराष्ट्राच्या व्हिजनबाबत चर्चा केली. यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांच्या उपयोगाद्वारे सर्वसमावेशक विकासाला गती देण्याचा विषयावर चर्चा झाली. pic.twitter.com/dl96817roL
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 1, 2020
राज्यातील युवकांना नवी दिशा देण्यासाठी आणि युवाशक्तीचा राज्याच्या विकासात उपयोग करून घेण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान युगातील नव्या प्रवाहाची माहिती देणे गरजेचे आहे. कृषी विकासासाठीही या नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राचे सहकार्य अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, पुणे इंटरनॅशनल सेंटर राज्याच्या विकासासाठी शासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे डॉ. माशेलकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
या विषयांवर चर्चा
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनांचा उपयोग करून राज्याच्या सर्वसमावेशक विकासाला गती देणे, राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी थिंक टँक म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरचा उपयोग करणे, कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि शेतकर्यांच्या समस्या दूर करण्यासाठी नव्या तंत्राचा उपयोग, रोजगाराला चालना देण्यासाठी प्रगतीच्या दिशेने वाटचाल, स्टार्ट अप, रोजगार आणि संपत्तीच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची भूमिका, जीएसटीमधील सुधारणा अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी चर्चा केली.


























































