पश्चिम बंगाल निवडणुकीची तयारी, अमित शहा बंगाली शिकतायत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा आणि झारखंडमध्ये पराभवाचा झटका बसलेल्या भाजपने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी वर्षभर आधीच तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बंगाली भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी घरात खास एका शिक्षकाची नेमणूक करून बंगाली कशी बोलायची, याचे धडे ते घेतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ‘बंगालीप्रेम’ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात भाजपचे पानिपत करण्याचा निर्धार केला आहे. निवडणुकीत त्यांच्या हातात ‘बंगाली अस्मिते’चा हुकमी एक्का असणार आहे. त्याचा मोठा धसका भाजपने वर्षभर आधीच घेतला आहे. ममता बॅनर्जींना धोबीपछाड देण्यासाठी अमित शहा यांनी बंगाली भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारसभांत किमान भाषणाची सुरुवात तरी बंगालीतून करण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे. भाषेबरोबरच शास्त्रीय संगीताचेही ते शिक्षण घेत आहेत.

प्रचाराची सूत्रे स्वतःकडेच
झारखंडमध्ये प्रचारसभांचा धडाका लावणारे अमित शहा हे पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे स्वतःकडेच ठेवणार आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाषेमुळे काही अडू नये, यासाठी ते बंगाली शिकत आहेत. बंगाली, तमीळसह चार भाषा त्यांना अवगत करायच्या आहेत. यात नवीन काही नाही, असे स्पष्टीकरण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिले.