मुंबईचा डाव पुन्हा गडगडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला शुक्रवारपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील लढतीत पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला. वानखेडे या घरच्या मैदानावर रेल्वेकडून सपाटून मार खाणाऱया मुंबईचा पहिला डाव कर्नाटकच्या गोलंदाजीपुढे 194 धावांमध्येच गडगडला. कर्नाटकने पहिल्या दिवसअखेरीस 3 बाद 79 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 115 धावांनी पिछाडीवर आहे.

कर्णधार सूर्यकुमारची झुंज

मुंबईचे इतर फलंदाज बाद होत असतानाच कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर किल्ला लढवला. त्याने 94 चेंडूंत 2 षटकार व 10 चौकारांसह 77 धावांची खेळी केली. शशांक अतार्डेने 35 धावा करीत मौल्यवान खेळी केली. मुंबईचा डाव 55.5 षटकांत गारद झाला. कर्नाटकडून वासुकी कौशिकने 45 धावा देत 3 फलंदाज बाद केले. अभिमन्यू मिथुन, रोनीत मोरे, प्रतीक जैन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

मुलानीचे 2 बळी

कर्नाटकने पहिल्या डावाची सुरुवात छान केली. रवी समर्थ व देवदत्त पडीकल यांनी 68 धावांची भागीदारी केली. शम्स मुलानीने देवदत्त पडीकलला 32 धावांवर बाद केले आणि जोडी फोडली. त्यानंतर शम्स मुलानीने अभिषेक रेड्डीला शून्यावरच बाद करीत कर्नाटकला दुसरा धक्का दिला. त्यानंतर शशांक अतार्डेने रोहन कदमला 4 धावांवर बाद केले. आता रवी समर्थ 40 धावांवर खेळत आहे.

पृथ्वीला दुखापत

युवा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ याला क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाली. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ही लढत सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पृथ्वी शॉ हिंदुस्थान ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे या दुखापतीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा डाव 44धावांमध्ये गारद

सर्व्हिसेसने महाराष्ट्राचा पहिला डाव 44 धावांमध्येच गारद केला. नवी दिल्ली येथे रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘सी’ गटामध्ये महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांच्यामध्ये लढत सुरू आहे. पूनम पुनिया ऍण्ड कंपनीच्या भेदक माऱयासमोर महाराष्ट्राचा डाव 30.2 षटकांतच आटोपला. महाराष्ट्राच्या 9 फलंदाजांना एकेरी धावसंख्याच करता आली. महाराष्ट्राचे 4 चार फलंदाज शून्यावरच बाद झाले. सर्व्हिसेसने पहिल्या दिवसअखेरीस 4 बाद 141 धावा केल्या आहेत.

स्टार खेळाडूंचा फ्लॉप शो

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कसोटीपटू पृथ्वी शॉ या दोन्ही फलंदाजांना रेल्वेविरुद्धच्या लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले होते. याही डावात त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळाली. पृथ्वी शॉने 29, अजिंक्य रहाणेने 7, सिद्धेश लाडने 4 तर संघात पुनरागमन झालेल्या सरफराज खानने 8 धावांची खेळी केली. कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.