
रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित ‘83’ सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात रणवीरने हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. 1983 साली हिंदुस्थानने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. या सिनेमात हीच कथा सांगण्यात आली आहे. कपिलदेव यांच्या वाढदिवसानिमित्त ‘83’ सिनेमाची टीम त्यांना खास सरप्राईज देणार आहे. वर्ल्ड कपमधील एका सामन्यात कपिलदेव यांनी झिम्बाम्ब्वे विरुद्ध खेळताना 175 धावांची खेळी केली होती, मात्र त्याच दिवशी कॅमेरामनचा संप असल्याने कपिलदेव यांची ही खेळी रेकॉर्ड होऊ शकली नव्हती. याच खेळीचे सिनेमात रूपांतर करण्यात येणार असून त्याचे चित्रीकरण कपिलदेव यांच्या 6 जानेवारीला असलेल्या वाढदिवशी होणार आहे. दस्तुरखुद्द कपिलदेव यावेळी हजेरी लावणार असून त्यांच्यासाठी हे अनोखे सरप्राईज असणार आहे.



























































