कन्हारगाव अभयारण्य – काळाची गरज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

कन्हारगाव अभयारण्य अस्तित्वात यावे यासाठी प्रयत्न सुरू असले तरी याबाबत फारशी प्रगती होताना दिसत नाही. या अभयारण्यास कुठल्याही प्रकारची फारशी व्याघ्र संवर्धनाची साधने नसतानाही इथे वाघ व इतर वन्य जिवांची उपस्थिती लक्षणीय आहे. भविष्यात जैवविविधतेने परिपूर्ण असे वनक्षेत्र आकार घेण्यास कन्हारगाव अभयारण्य अगदी अनुकूल आहे.

2019 साली जाहीर झालेल्या गणनेतून वाघांची संख्या महाराष्ट्रात 300 च्या वर आढळून आली आहे. मात्र असे असले तरी वाघ व इतर वन्य जिवांच्या तुलनेत कमी असलेले वनक्षेत्र हा विरोधाभास प्रकर्षाने दिसून येतो. गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिह्यातील कन्हारगाव अभयारण्य अस्तित्वात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाने अगोदरच अभयारण्याला मान्यता दिली आहेत. पाच वर्षांपूर्वी 400 चौ. कि.मी.चे क्षेत्र कन्हारगाव अभयारण्यासाठी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत या प्रस्तावाचा प्रवास शासनदरबारी उलटय़ा दिशेने सुरू असल्याचे दिसून आले. पुढे 265 चौ. कि.मी.चे क्षेत्र मान्य करण्यात आले. यावर अंमलबजावणी करण्यात वेळ वाढत असताना प्रस्तावित वनक्षेत्र पुन्हा कमी करून 210 चौ. कि.मी. ठरवण्यात आले, परंतु अद्याप यावर काहीच प्रगती दिसत नाही.

कन्हारगाव अभयारण्य अस्तित्वात आल्यास हे क्षेत्र संरक्षित क्षेत्रात परिवर्तित होईल. आज कुठल्याही प्रकारची फारशी व्याघ्र संवर्धनाची साधने नसताना या क्षेत्रात वाघ व इतर वन्य जीवांची उपस्थिती लक्षणीय आहे. 2015 च्या गणनेत कन्हारगाव परिसरातील 400 चौ. कि.मी. क्षेत्रात 10 वाघ व 15 बिबट व इतर वन्य जीव आढळून आले. भविष्यात ताडोबा, किंबहुना त्यापेक्षा अधिक समृद्ध व जैवविविधतेने परिपूर्ण असे वनक्षेत्र आकार घेऊ शकेल. त्यातून वन्य जीवांचे संवर्धन आणि नागरिकांना चांगला रोजगार निर्माण होईल. पर्यटनासाठी अनेक पर्यटक प्रवेश न मिळाल्याने निराश होतात. पर्यटकांना भरपूर वन्य जीव असलेल्या अजून एका वनक्षेत्राची दारे उघडली जातील. वन हक्क कायद्यांतर्गत वनक्षेत्रातील नागरिकांना विशेष हक्क प्रदान केलेले आहेत त्याचे पालन होणे ही प्राथमिकता आहेच, परंतु वन हक्क कायद्यांतर्गत वनवासी नागरिकांनी वन्य जीव व जैवविविधतेचे संवर्धन करणेसुद्धा तितकेच गरजेचे असल्याचा उल्लेख आहे. या तरतुदींकडेसुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. पाच वर्षांपासून प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्य प्रलंबित आहे. याला जबाबदार नागरिक नसून FDCM असल्याचा आरोप मोठय़ा प्रमाणात होतो. वास्तविक FDCM कडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विरोध हा अनाठायी ठरतो.

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्राच्या (FDCM) अंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्र येते. इअश् च्या माध्यमातून केवळ तीन ते चार महिने लोकांना रोजगार मिळतो. मात्र रोजगार मिळणारे लोक स्थानिक नसून बाहेरून आणले जातात. इअश् बाहेरचे मजूर आणून वृक्ष कापण्याचे काम त्यांना देत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मध्य प्रदेशातून आलेले मजूर पाणवठय़ांवर निवास करत असल्याने वन्य जीवांच्या दृष्टीने घातक ठरते. अभयारण्य झाल्यास मोठय़ा प्रमाणात पर्यटन, गस्ती पथकं यांसारख्या माध्यमांतून बारमाही रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे सरकारवर त्याचा कुठलाही आर्थिक भार पडत नाही. अभयारण्य जाहीर झाल्यास दोन गावं त्या परिक्षेत्राच्या अंतर्गत येतात. कन्हारगाव, गणपूर या दोन गावांतील साधारणतः 200-225 कुटुंबांना स्थलांतरित करता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा विरोध नसून त्यांना उपलब्ध रोजगार संधींची त्यांना जाणीव आहे. कन्हारगाव अभयारण्य झाल्यास वन्य जीवांना एक नैसर्गिक मार्ग मिळून योग्य संवर्धन होईल. सध्याच्या परिस्थितीत वनक्षेत्रात वन्य जिवांच्या मुक्त संचारास विद्युत कुंपणांचा अडथळा आहे. विद्युत कुंपणाला प्रतिबंध घालणारा कुठलाच कायदा अस्तित्वात नाही. याअगोदर या भागातील खरलपेठच्या दिशेने नैसर्गिक मार्ग होता, परंतु विद्युत कुंपणांच्या वापरामुळे वन्य जीवांच्या मार्गातला अडसर कन्हारगाव अभयारण्याच्या माध्यमातून अधिक सुकर होईल. वैनगंगा व वर्धा नदीचे पात्र हे या भागाला निसर्गाने दिलेले वरदान आहे.

उदय पटेल गडचिरोलीचे मानद वन्य जीवरक्षक यांच्या मते कन्हारगाव अभयारण्य झाल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे कन्हारगाव हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असे क्षेत्र आहे. कन्हारगाव हे गडचिरोली व तेलंगणाला जोडणारे एकमेव क्षेत्र आहे. 300 चौ किमीच्या क्षेत्रात बारमाही असे लहानमोठे 25 पाणवठे या क्षेत्रात आढळतात. 2012 साली देशभरात अनेक वाघांचे मृत्यू झाले, परंतु कन्हारगाव व ताडोबा या दोन ठिकाणी असे काही घडले नाही. याचे कारण इथली समृद्ध जैवविविधता आहे. प्राणहिता व चपराळा अभयारण्य (गडचिरोली जिल्हा), टिपेश्वर (यवतमाळ जिल्हा) व कावल व्याघ्र प्रकल्प (तेलंगणा) या तीन ठिकाणी प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्याचे वन्य जिवांना द्वार खुले होते. वाघांना हालचालीसाठी ज्या प्रमाणात भौगोलिक क्षेत्राची गरज आहे, त्यासाठी कन्हारगाव आदर्श क्षेत्र ठरेल.

प्रफुल्ल भांबूरकर, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य यांच्या मते कन्हारगाव वनक्षेत्र हे उपग्रह कोर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रातील वनसंपदा अतिशय समृद्ध आहे. बांबूच्या झाडांचा प्रभाव असल्याने मुबलक पाणीसाठा येथे आढळतो, परंतु बांबू तोडून सागवानाची लागवड अशास्त्राrय ठरते आहे. रानकोंबडी, सांबर, गौर असलेले वनक्षेत्र एक आदर्श वनक्षेत्र ठरते. ताडोबात नसलेली अनेक फळझाडे या क्षेत्रात आहेत. 60 टक्के वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीचा नावलौकिक आहे. कन्हारगाव हा दक्षिणेकडे वन्य जिवांचा भ्रमणमार्ग आहे. संरक्षित वनक्षेत्र यातून जोडले जाऊन जैवविविधतेचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन होऊ शकेल. प्रजननाच्या दृष्टीने वन्य जिवांना भ्रमण करण्यासाठी याचे फार मोठे महत्त्व आहे. अभयारण्य जाहीर झाल्यास अनेक संरक्षित क्षेत्रे जोडली जाऊन खऱया अर्थाने वन्य जीव संवर्धन होईल.

[email protected]