
धर्मनिरपेक्षता या शब्दाकर केंद्र सरकारने पुनर्विचार करावा. कारण हा शब्द पाश्चिमात्यातून आला असल्याचे सांगत राज्यघटनेच्या सरनाम्यातून ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वगळण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व संयोजक नंदकुमार यांनी केली आहे.
आरएसएसच्या एका पदाधिकार्याने लिहिलेल्या ‘बदलत्या काळातील हिंदुत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन संघाचे संयोजक नंदकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना नंदकुमार यांनी संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाची आवश्यकता नसल्याचे सांगत तो वगळण्याची मागणी केली. संविधानाचे संस्थापकही या विरोधात होते, असा दावाही त्यांनी केला आहे. संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपालही या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्यासह संविधानाचे सर्व सदस्य या शब्दाविरोधात होते. त्यांनी धर्मनिरपेक्ष या शब्दाला संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करणे आवश्यक नाही असे म्हटले होते. तरीही त्यांची मागणी त्यावेळी फेटाळण्यात आली व या शब्दाचा संविधानाच्या प्रस्तावनेत समावेश करण्यात आल्याचा दावा नंदकुमार यांनी आपल्या भाषणात केला.
हिंदुस्थानात या शब्दाची आवश्यकता नाही
हिंदुस्थानात धर्मनिरपेक्ष या शब्दाची आवश्यकता नाही. धर्मनिरपेक्ष असण्याचा आम्हाला बोर्ड लावण्याची खरंच गरज आहे का, हे पाहावे लागणार आहे. व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून हे आम्हाला सिद्ध करावे लागणार आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केली. नंदकुमार यांनी ‘पश्चिम बंगालचे इस्लामीकरण’ या पुस्तकातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
























































