
जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरमध्ये सामाजिक वातावरण चांगलंच बदललं आहे. कलम हटवल्यानंतर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मोबाईल, इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. अर्थात स्थानिक जीवनावर त्यामुळे अडचणी निर्माण होत असल्या तरी त्याचे काही सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
कश्मीरमध्ये सध्या शैक्षणिक वातावरण बहरू लागल्याचं चित्र आहे. इंटरनेट आणि मोबाईल नसल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा कल वाचनाकडे झुकला आहे. कश्मीरमधील किशोरवयीन विद्यार्थी वाचनालयात जास्तीत जास्त वेळ राहू लागले आहेत. पूर्वी वाचनालयात आठवड्याला 50 ते 60 विद्यार्थी येत असत. पण, आता हा आकडा दिवसा 100 विद्यार्थ्यांवर गेला आहे.
तसेच मोबाईलमुळे ओस पडत असलेली मैदाने आता पुन्हा मुलांच्या हसण्या-खिदळण्याने गजबजू लागली आहेत. अनेक मुलांना सतत मोबाईल वापरल्याने मोबाईलचे व्यसन जडले होते. त्यांची संख्याही आता शून्यावर आली आहे. तीच मुलं आता अनेक मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत. अनेक तरुण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ लागले आहेत. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर थांबल्याने तरुणाईच्या मानसिक आरोग्यातही विलक्षण सुधारणा दिसून येत असल्याचं निरीक्षण इथल्या मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.





























































