वादळ! टी-20 मध्ये एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकत विश्वविक्रम… पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडचा तरुण फलंदाज लिओ कार्टर याने रविवारी टी -20 क्रिकेटमध्ये एकाच षटकामध्ये सलग सहा षटकार लगावत कार्टरने विक्रमी कामगिरी केली. टी -20 क्रिकेटमध्ये षटकात 6 षटकार मारणारा कार्टर हा जगातील सातवा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानच्या युवराज सिंगच्या नावावर सलग सहा षटकारांचा विक्रम आहे.

न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी स्थानिक टी -20 स्पर्धेत कँटरबरी संघाकडून खेळून ही कामगिरी केली. लिओने नॉर्दर्न नाईट्स विरुद्धच्या षटकात सलग 6 षटकार लगावत ही कामगिरी केली. त्याने नाईट्स संघाचा फिरकी गोलंदाज अँटोन डेवसिच याच्या एकाच षटकात सलग 6 षटकार ठोकले. कार्टरच्या 29 चेंडूतील 70 धावांच्या दणदणीत खेळीच्या बळावर कँटरबरी संघाने 219 धावांचे आव्हान लिलया पार केले.

2007 मध्ये आयसीसी टी -20 विश्वचषकात हिंदुस्थानच्या युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सलग सहा चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकले होते. युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग सहा चेंडूंत सहा षटकार ठोकले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सलग सहा षटकारांचा विक्रम अद्यापही युवराजच्या नावावर आहे.

एकाच षटकांत 6 षटकार ठोकणारे फलंदाज –

एका षटकात सहा षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कार्टर हा जगातील सातवा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स, हिंदुस्थानचे रवी शास्त्री, युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स, इंग्लंडचा रॉस विटली आणि अफगाणिस्तानचा हजरतुल्ला जजई यांनी ही कामगिरी नोंदविली आहे.