मंत्रालयात आज लगबग, मंत्री पदभार स्वीकारणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

बंगला मिळाला, दालनही मिळाले आणि आता खातेवाटपही झाले. त्यामुळे आता जोमाने कामाला लागूया, असा निर्धार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केला आहे. बहुतांश मंत्री आज, सोमवारीच आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारणार असून नव्या जबाबदारीबद्दल प्रत्येकानेच समाधान व्यक्त केले आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी सकाळी मंजुरी दिली. त्यानंतर खातेवाटपाची अधिकृत यादी प्रसिद्ध झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीचे प्रत्येक मंत्र्याने स्वागत केले असून आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.  

तत्काळ कामाला सुरुवात

गृह विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याशिवाय इतर पाच खात्यांचीही जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रासाठी चांगले काम करण्याची मला संधी मिळाली आहे. – शंभुराज देसाई, राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजगता, पणन

नेत्यांच्या निर्णयाप्रमाणे काम

खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्षातील नेत्यांचा आहे. त्यांनी माझ्याबाबतीत जो निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे काम करीन. हा विभाग मी पूर्वीही सांभाळला आहे. सोमवारपासून कामाला लागणार आहे. अधिकार्‍यांची सोमवारी बैठक बोलावली आहे. – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)

हंगामी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने नियोजन करणार आहे. हंगामी स्वरूपाचे कामगार, ऍप्रेंटिस यांच्या प्रश्नावरही काम करणार आहे. तरुण मुले वर्षानुवर्षे तात्पुरत्या स्वरूपाचे काम करतात. त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल याकडे लक्ष देणार आहे. – दिलीप वळसे-पाटील, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री  

तरुणांना स्वयंरोजगार

अल्पसंख्याकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. तरुणांना नवीन प्रशिक्षण देऊन रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचीही जबाबदारी आहे. बेरोजगारांचे मोठे संकट आहे. त्या दिशेने काम करणे मोठे आव्हान आहे. – नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास, औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री

दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न

प्राध्यापिका म्हणून पाच वर्षे काम केल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील शिक्षणातील फरक दूर करणार. – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री