लेख – रंग-आकारांचा जादुई चमत्कार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन सीताराम शेपाळ ([email protected])

कला संचालनालयाने महाराष्ट्रातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यासाठी एक ‘कला व्यासपीठ’ निर्माण करून दिले आहे. 2020 हे साठावे वर्ष. या कला संचालनालयातर्फे आयोजित राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (7 जानेवारी) होत आहे. रंग आणि आकारांचा जादुई चमत्कार म्हणजे राज्य कला प्रदर्शन होय! अनेक शैली, तंत्र आणि अनेक पृष्ठभागांवर अदृश्य प्रतिभाशक्ती दृश्य स्वरूपात पाहायला मिळते या प्रदर्शनात! महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सहयोग आणि महाराष्ट्राच्या दैनंदिनीचा पारंपरिकतेसह पदन्यास म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ होय.

जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा, एलिफंटा अशा समृद्ध लेणी स्थापत्य कला लाभलेल्या महाराष्ट्राला एकमेव असे ‘कला संचालनालय’ आहे आणि या कला संचालनालयांतर्गत असलेल्या चार शासकीय, 31 अनुदानित आणि 178 विनाअनुदानित कला महाविद्यालयांतील कला विद्यार्थ्यांनी आकारबद्ध तसेच रंगबद्ध केलेल्या कलाकृती गेली 59 वर्षे प्रदर्शित केल्या जातात त्या राज्य कला प्रदर्शनाच्या माध्यमातून!

signal

मंगळवार 7 जानेवारी 2020 रोजी 60 व्या कलाकार विभागाचे, राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. रंग आणि आकारांचा जादुई चमत्कार म्हणजे राज्य कला प्रदर्शन होय! अनेक शैली, अनेक तंत्र आणि अनेक पृष्ठभागांवर अदृश्य प्रतिभाशक्ती दृश्य स्वरूपात पाहायला मिळते या प्रदर्शनात! महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सहयोग आणि महाराष्ट्राच्या दैनंदिनीचा पारंपरिकतेसह पदन्यास म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ होय.

जून 1965 साठी स्थापन झालेल्या कला संचालनालयाने महाराष्ट्रातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यासाठी जसजशी संधी आणि काळ-वेळ उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा एक ‘कला व्यासपीठ’ निर्माण करून दिले आहे. 2020 हे साठावे वर्ष. या व्यासपीठावरून महाराष्ट्राने जगाला अनेक कलाकार बहाल केले आहेत. चित्रपट-नाटय़-कला-चित्र व शिल्पकला आणि उपयोजित कला अशा विभागांत व्यावसायिक यशस्वीता आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेले आघाडीचे कलाकार व कला संचालनालयांतर्गत असलेल्या कला महाविद्यालयांद्वारे कलाजगताला बहाल केले आहेत.

या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 590 कलाकृती पाठवून कलाकारांनी सहभाग घेतला. पैकी 214 कलाकृतींची निवड या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यासाठी झालेली आहे. या 214 कलाकृतींमधून 15 कलाकृतींना 50 हजार रुपये याप्रमाणे 7 लाख 50 हजार रुपये रोख रकमेसह प्रमाणपत्रांसाठी निवडण्यात आले. उपयोजित कला, चित्रकला, शिल्पकला, मुद्राचित्रण कला या विभागांतून आणि एक महिला कलाकार व एक दिव्यांग कलाकार अशी त्या पारितोषिकांची विभागणी आहे. या 15 कलाकारांची नावे याप्रमाणे- 1) कुलकर्णी प्रशांत प्रमोद 2) आवळे प्रेम संजय 3) चव्हाण विनोद मनाजी 4) चव्हाण लक्ष्मण सूर्यभान  5) कदम श्रीकांत लालासाहेब, 6) सय्यद रईस सय्यद भिकान 7) कुलये नंदकुमार यशवंत 8) कुंभार अभिजित अनिल 9) वेले उदय नारायण, 10) डावखर वैभव राजाराम 11) सावंत चिन्मय विलास 12) निकम प्रशांत प्रदीप 13) श्रीमती अपंदकर श्वेता गोपीनाथ, 14) जोशी अभिषेक संजय आणि दिव्यांग कलाकार 15) शिंगाडे सिद्धार्थ शहाजीराव. ही त्या पारितोषिकप्राप्त कलाकारांची नावे आहेत.

कला संचालनालयाच्या या राज्य कला प्रदर्शनात या वर्षापासूनच रुपये पाच लाख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र अशा स्वरूपाच्या ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्काराची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या वर्षी ज्येष्ठ चित्रकार पद्मभूषण अकबर पदमसी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायं. 6 च्या दरम्यान हा सोहळा, कलाकारांची पंढरी असलेल्या जहांगीर कलादालनात संपन्न होत आहे.

कला संचालनालयामार्फत कलाकाराच्या विभागाच्या राज्य कला प्रदर्शनाचे औचित्य साधून एका ज्येष्ठ व्यावसायिक कलाकाराचे कलाविषयक योगदान विचारात घेऊन एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून गौरविण्यात येत आहे. या वर्षी नागपूर स्थित ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडे यांना सन्मानित करण्यात येत आहे. 93 वर्षीय या ज्येष्ठ चित्रकार सत्कारमूर्तीने 1963 साली ‘कलाश्री’ ही संस्था स्थापन केली. वयाच्या 93 व्या वर्षीही ही कलातपस्वी व्यक्ती रोज रियाजाप्रमाणे चित्रकला निर्मिती करीत असते. अशा विविधांगी महान कलासाधकांच्या कलोपासनेचा सन्मान महाराष्ट्र शासनाकडून केला जातो. दरवर्षी चित्र, शिल्प, उपयोजित कला वा लोककला प्रकारांतील महनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांना आवर्जून सन्मानित करून कला व संस्कृतीचा सन्मान राखणारे महाराष्ट्र हे राज्य अग्रभागी आहे.

या कला प्रदर्शनात तैलरंग, ऍक्रॅलिक रंग, जलरंग, इंक, चारकोल, पेन, पेन्सिल या रंगमाध्यमांचा कॅनव्हास, पेपर्स, धातू वा लाकडी पार्श्वभूमीवर विविध शैली आणि तंत्रांचा उपयोग करून कलाकृती साधलेल्या आहेत. शिवाय लाकूड, दगड, धातू यांसह काच, फायबर ग्लास, माती वगैरे माध्यमांद्वारे त्रिमिताकार प्रदर्शित केलेले आहेत. वास्तववादी शैली, अवास्तववादी शैली अशा प्रकारांतील 214 कलाकृती एकाच वेळी जहांगीर कलादालनात पाहणे ही या वर्षाच्या प्रारंभीच आलेली पर्वणी चुकवू नये असे आवाहन प्रा. राजीव मिश्रा, प्रा. संदीप डोंगरे आणि सहाध्यायी अधिकारीवर्गाने कला संचालनालयातर्फे केलेले आहे. हे प्रदर्शन दि. 7 ते 14 जानेवारी या सप्ताहात जहांगीर कलादालनात सुरू राहील.