महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे मला ‘26/11’च्या मुंबई हल्ल्याची आठवण झाली. हे हल्लेखोर कुठून आले, ते कोण आहेत, त्यांचा बुरख्याआडचा खरा चेहरा जनतेसमोर यायलाच हवा, अशा परखड भावना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केल्या.

जेएनयू हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बुरखाधाऱ्यांनी अत्यंत भ्याड कृत्य केले आहे. जर हिंमत असेल तर तोंडावर बुरखा का घालता? जर धाडस असतं तर त्यांना हे करण्याची गरजच नव्हती. ते कोणीही असतील तरी त्यांना कठोरात कठोर शासन व्हायलाच हवं. सरकार कोणतंही असलं तरी असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हिंदुस्थान या भ्याडपणाचं कधीही समर्थन करणार नाही.

कारवाई झाली नाही तर संशय निर्माण होणारच
जेएनयूमध्ये हा हल्ला होत असताना तो पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, जर पोलीसच कारवाई करणार नाहीत तर संशय निर्माण होणारच. या हल्ल्याला एबीव्हीपी तसेच अन्य संघटना कारणीभूत आहेत का, असे विचारण्यात आले असता उद्धव ठाकरे यांनी यामध्ये आपण राजकारण आणणार नसल्याचे स्पष्ट केले. जे कोणी जबाबदार असतील त्यांना शोधून शिक्षा झाली पाहिजे. हे जर नाही झालं तर यात राजकारण आहे का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. हल्लेखोरांच्या चेहऱयावरचा मुखवटा ओरबाडून त्यांचा चेहरा जनतेसमोर यायलाच हवा, असे सांगतानाच हा स्पॉन्सर्ड हल्ला होता की नव्हता हे पुढच्या काही काळात सिद्ध होईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी युवा पिढीसोबत
तरुणांच्या मनातला उद्रेक बाहेर येतो आहे. या युवा शक्तीला आवाहन करतो की, आपल्या मनातील उद्रेक हा माझ्या मनातही आहे. या आधारस्तंभांना मजबूत करण्याचं काम महाराष्ट्राने करायला हवं. मी या युवकांच्या सोबत आहे. कोणीही महाराष्ट्रात भीती बाळगण्याचं कारण नाह़ी महाराष्ट्रात चिंता करण्याची गरज नाही. त्यांना विश्वास देतो की, अशी कोणतीही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

काही जणांचा भातुकलीचा खेळ सुरू आहे, खेळू द्या!
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुढीपाडव्याला नवीन सरकार अस्तित्वात येईल असं वक्तव्य केलं असल्याबाबत विचारले असता ‘‘बिचारे काही जण भातुकलीचा खेळ खेळतात, त्यांना खेळू द्या,’’ असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही!
महाराष्ट्रात असले हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत. देशात जे घडतंय ते अयोग्यच आहे, पण महाराष्ट्रात काळजी करण्याचं कारण नाही. आपण राज्यात सुरक्षित आहात. राज्यातील विद्यापीठांची सुरक्षा वाढविण्याची आवश्यकता असेल तर ती वाढविली जाईल, पण कोणीही विद्यार्थ्यांच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न करेल अशा कोणत्याही शक्तीची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. त्यांना कठोरात कठोर शासन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

देशातील युवक डरपोक नाही
मी याआधीच सांगितलं आहे की, ज्या युवकांना आपण देशाचे आधारस्तंभ समजतो, त्या युवकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना शिक्षण, रोजगाराबरोबरच एका चांगल्या विचारधारेची गरज आहे. ही युवा शक्ती म्हणजे युवा बॉम्ब आहे. त्यांच्यात मोठय़ा प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांच्या मनात राग आहे. ही युवा शक्ती डरपोक नाही. त्यांना विश्वासात घ्या. हा युवा बॉम्ब पेटवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.

पूर्वनियोजित भ्याड हल्ला
हिंसेचा आधार घेऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही. जेएनयूतील हल्ला हा पूर्वनियोजित आणि भ्याड होता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

हल्लेखोरांना मोदी सरकारचे संरक्षण
हल्लेखोरांना मोदी सरकारचे संरक्षण असून युवक आणि विद्यार्थ्यांचा आवाज बंद करण्यासाठीच गुंडांचा आसरा घेतला जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

दोषींवर तत्काळ कारवाई करा
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही जेएनयू हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी केली आहे. लोकशाहीत हिंसेला थारा देता कामा नये. सर्वांनीच याचा निषेध करावा, असेही ते म्हणाले.

न्यायालयीन चौकशी करा
या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी बसपा नेत्या मायावती यांनी केली आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घ्यावी. विद्यार्थी आणि प्राध्यापकांवरील हा भ्याड हल्ला निषेधार्हच आहे, असेही त्या म्हणाल्या.