नागपाडा येथे भीषण आग 8 जण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagpada-fire

नागपाडामधील कामाठीपुरा परिसरातील व्यावसायिक इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य हाती घेतल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. आगीत दोन वर्षांच्या मुलीसह 8 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आगीत गोदामे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायरिंग जळून खाक झाले तर व्यावसायिक गाळ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

नागपाडय़ामध्ये कामाठीपुरातील बगदादी कंपाउंडमधील चायना या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यावर असलेल्या लेदर, कपडे यांच्या गोदामाला सकाळी 9 वाजता आग लागली. लेदर आणि कपडे यांची गोदामे असल्यामुळे काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीमुळे या इमारतीचा काही भाग कोसळून पडला आहे तर काही भागाला तडे गेले. आगीचा धूर परिसरात पसरल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्य हाती घेत इमारतीत अडकलेली लहान मुलगी आणि वृद्धासह 8 जणांना सुखरूप बाहेर काढले. धुरामुळे श्वास कोंडल्यामुळे त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीवर दुपारी अडीच वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या जखमींमध्ये अनिया (2), चांदणी शेख (25), निशा देवी (32), मोहनराम (70), आदिल कुरेशी (20), रंजना देवी ( 24) नेहा कुरेशी (27) आणि चंदा देवी ( 60) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाने सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.