
योगी आदित्यनाथ सरकारने मशिदीसाठी अयोध्येतील पाच जागांची निवड केली आहे. या पाचही जागा अयोध्या पंचक्रोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत. मात्र मुस्लिम पक्षकारांना यापैकी कोणती जमीन द्यायची यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देताना मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच अन्य ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. ही जमीन अयोध्येच्या प्रमुख ठिकाणी असली पाहिजे असेही सांगितले होते. त्यानुसार राज्य सरकारने पाच जागांची निवड केली आहे.
या आहेत जागा
मलिकपुरा, डाभासेमर मसौधा, मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर अशा पाच जागा मशिदीसाठी निवडण्यात आल्या आहेत. या सर्व जागा अयोध्येतून जाणाऱया आणि विभिन्न शहरांना जोडणाऱया मुख्य रस्त्यांवर आहेत. चार जागा या अयोध्या- फैजाबाद मार्ग, अयोध्या-बस्ती मार्ग, अयोध्या-सुलतानपूर मार्ग आणि अयोध्या-गोरखपूर मार्गावर आहेत. पाचवी जागा पंचकोशी परिक्रमा मार्गापासून दूर प्रस्तावित आहे. निवडलेल्या जागेवर गावकऱयांनी अतिक्रमण केलेले आहे. या जागेवर गावकरी शेती करत आहेत.
पंचक्रोशी परिक्रमेबाहेरील जागा
पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे 15 किलोमीटरचा परिसर आहे, ज्याला पवित्र क्षेत्र समजले जाते. पंचक्रोशी परिक्रमा दरवर्षी पावसाळय़ात दोन दिवस केली जाते. शरयू नदीत पवित्र स्नान केल्यानंतर भाविक शहराच्या चारही बाजूला 15 किलोमीटरची परिक्रमा करतात. प्रयागराज, हरिद्वार, मथुरा आणि काशी येथील तब्बल 50 हजार साधुसंत या कार्यक्रमात सहभागी होतात. मशिदीसाठी ज्या पाच जागा निवडण्यात आल्या आहेत त्या पंचक्रोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत.

























































