
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना नेहमीच वेगवेगळ्या शकला लढवाव्या लागतात. बऱयाचदा गनिमीकावा करत गुन्हेगारांवर झडप घालावी लागते. दोन दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी असाच गमिनीकावा करीत दोघा ड्रग्ज माफियांना पकडले. त्या दोघांकडून तब्बल 12 कोटी किमतीचा हेरॉईनचा साठा सापडला.
गेल्या वर्षभरात ड्रग्ज माफियांचे कर्दनकाळ ठरलेले गुन्हे शाखेच्या अंमलीविरोधी पथकाने वर्षीच्या सुरूवातीलाच धडक कारवाई केली. वांद्रे युनीटला खबर मिळाली होती की, मालाड पश्चिमेस दोघे ड्रग्ज माफिया हेरॉईनचा साठा घेऊन येणार आहेत. त्यानुसार निरीक्षक अनिल वाढवणे व त्यांच्या पथकाने त्या दोघा माफियांना पकडण्यासाठी तयारी सुरू केली. पण कुठल्याही मोठया कारवाईत स्वतः पुढाकार घेत स्पॉटवर जाणारे उपायुक्त शिवदिप लांडे हे देखील कारवाईसाठी तयार झाले. हेरॉईनचा साठा घेऊन येणारे दोघे मोठे ड्रग्ज माफिया असून त्यांना पकडल्यास नशेबाजांचे पुरते वांदे होणार असल्याने पोलिसांनी मालाड पश्चिमेस फिल्डिंग लावली. लांडे स्वत: बहिरजी नाईक होत स्पॉटवर गेले. त्यांच्यासह अधिकारी कर्मचायांनी वेशभुषा बदलली. लांडे रिक्षावाले तर कोणी गुंड बनला अशा प्रकारे स्थानिक दिसावे अशा वेषात पोलिसांनी तेथे सापळा रचला. परिसरात सीसीटिव्ही कुठे आहेत, ते दोघे कुठे येतील, त्यांच्यावर कुठे झडप घालायची याची तयारी करून मग हेरॉईनचा साठा घेऊन आलेल्या राजेश जोशी आणि कृष्णमुर्ती कावंडर या दोघांनीही 12 कोटी किमतीच्या हेरॉईनसह रंगेहात पकडले.
अलगद जाळ्यात सापडले
लांडे व त्यांच्या पथकाने वेशभुषा बदलून सापळा लावल्यामुळे मालाडमध्ये राहणारा राजेश आणि गोराईत राहणारा कृष्णमुर्ती यांना आजुबाजूस पोलीस असल्याचे समजलेच नाही आणि दोघे अलगत पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या कारवाईमुळे मात्र पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत.
लांडे यांना डीआयजी पदी बढती
बिहार कॅडरचे थेट आयपीएस अधिकारी आणि सध्या प्रतिनियुक्तीवर मुंबईत असलेले दंबग अधिकारी शिवदिप लांडे यांना पोलिस उपमहानिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. गेल्या तीन वर्षापासूंन महाराष्ट्र पोलिस दलात प्रतिनियुक्तीवर असलेले लांडे हे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी या तीन वर्षात ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्याचे जोरदार काम केले. ते सध्या वरिष्ठ उपायुक्त म्हणून मुंबई पोलिस दलात काम करत होते. मात्र बिहार सरकारने त्यांना आज पोलिस उपनिरीक्षकपदी बढती दिली. डीआयजी बनलेल्या लांडे यांना आता कोणती जबाबदारी मिळते याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.

























































