इराणकडून ‘ऐलान ए जंग’ घोषित, फडकावला लाल झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेजर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणने थेट युद्धाची घोषणा केली आहे. इराणने प्रसिद्ध ‘मस्जिद- ए- कुम’ वर लाल झेंडा फडकावून अमेरिकेबरोबर युद्धाचे बिगुल वाजवले आहे. इराणच्या या युद्धाच्या घोषणेमुळे आंतराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून इराणच्या प्रत्येक हालचालींकडे जगाचे लक्ष आहे.

इराणमध्ये मस्जिद- ए- कुम या मशिदीवर लाल झेंडा फडकावणे ही युद्धाची घोषणा असल्याचे मानले जाते. हा झेंडा फडकावून इराण सरकारने जनतेला आणि लष्कराला लढण्यास तयार राहण्याचा संदेश दिला आहे. लाल झेंडा फडकावल्यानंतर लगेचच जनरल कासीम सुलेमानी यांच्या जागी कुर्दचे नवे प्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या जनरल इस्माईल घानी यांनी अमेरिकेच्या नावाने एक संदेश जारी केला. त्यात मेजर जनरल कासीम सुलेमानी आणि डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस यांच्यासह शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाच्या रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ, फक्त वाट पहा असा इशारा दिला आहे. इराणच्या या भूमिकेवर अमेरिकेने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराण चवताळला आहे. अमेरिकेविरोधात येथील जनता संतप्त झाली असून इराणच्या संसदेपासून रस्त्यापर्यंत सर्वत्र डेथ टू अमेरिकाचा नारा दिला जात आहे. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील 52 ठिकाणे आमच्या निशाण्यावर असल्याचे सांगत इराणला धमकी दिली होती. इराकने अमेरिकी सैन्याला देश सोडून जाण्यास सांगितल्याने अधिकच संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी यावेळी इराकवरही निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता.