कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या निर्देशानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने भाजपा सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य दूर करण्यासाठी भाजपा सरकारने कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर विशेष निमंत्रित तज्ञ संचालकांच्या नेमणुका केल्या होत्या. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने या नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत तज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील यासंदर्भातील तरतूद देखील वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अधिनियमानुसार 13 जून 2015 पासून तज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली.