राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवार यांनी घेतली शिकवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-new1

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिले. या वेळी त्यांनी नवीन मंत्र्यांना मंत्रालयीन कामकाज व प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहितीही करून दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीचे खातेवाटप झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रथमच मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तीन तास बैठक घेतली.

बैठकीनंतर पक्षाचे प्रवत्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. नवाब मलिक म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आल्यापासून शरद पवार आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना विविध सूचना करत आहेत. खातेवाटप झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मंत्र्यांची बैठक घेतली. तीन तास त्यांनी आपल्या मंत्र्यांना धडे दिले.

नवीन मंत्र्यांना मंत्रालयीन कामकाज व प्रशासकीय यंत्रणेची त्यांनी माहिती दिली. याचसोबत सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची विकासकामे करण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. आपल्या मतदार संघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करू नका. विकासकामे करताना त्यांना विचारात घ्या. पालकमंत्री हे सरकार आणि पक्षाचा चेहरा असतो. त्यामुळे जिह्यात अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे, अशी सूचनाही पवार यांनी या बैठकीत केल्याचे मलिक यांनी सांगितले.

न्या. लोया मृत्यू प्रकरण
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शरद पवार यांनी न्यायमूर्ती बृजगोपाल लोया यांच्या मृत्यूबाबत कोणाची तक्रार असेल तर चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तेच सांगितले आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणी कोणाचा संशय किंवा तक्रार असेल तर सरकार नक्की पावले उचलेल, असा पुनरुच्चारही मलिक यांनी केला.