अमित शहा यांच्या रॅलीत विरोधातले बॅनर झळकले! 150 जणांच्या जमावाचा दोन तरुणींवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या रॅलीत दोन तरुणींनी नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात बॅनर झळकवले. त्यामुळे संतप्त झालेल्या 150 जणांच्या जमावाने त्या तरुणींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आम्ही बॅनरवर कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरली नव्हती, तरीही जमावाने संतापून आमच्या घरावर धाव घेतली, असा दावा त्या तरुणींनी केला.

गृह मंत्री शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दिल्लीत रॅली काढली होती. खुद्द गृह मंत्रीच रॅलीचे नेतृत्व करीत असल्याचे पाहून तरुणींनी सीएएविरोधी बॅनर झळकावला. या वेळी रॅलीतील काही जण संतापले व आम्हाला धमक्या देऊ लागले. 150 जणांच्या जमावाने आमच्या हातातील बॅनर फाडून टाकला. दरकाजा उघडला नाही म्हणून दरवाजा तोडण्याचीही धमकी दिली, असे सूर्या राजप्पन हिने बुधवारी सांगितले. जमावाच्या दहशतीमुळे घरात सात तास अडकून पडलो. पोलीस आणि नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर घरातून बाहेर पडलो, असेही ती म्हणाली.

भाडय़ाच्या घरातून हाकलून दिले
जमावाने आदळआपट केल्यानंतर आम्हाला घरमालकाने भाडय़ाच्या घरातून हाकलून दिले. पायऱ्यांवरून जाताना लागणाऱ्या प्रवेशद्वाराला घरमालकाने कुलूप लावले. घरमालकसुद्धा जमावाच्याच सांगण्यावरून वागला, असा दावा तरुणींनी केला आहे.