
काळोख असलेल्या घरात विकासाचा दिवा पेटला पाहिजे. घर पेटवणे फार सोपे आहे. वाद करा आणि पेटवा घर! पण त्या घरातील चूल पेटवणे अतिशय कठीण असते. उद्योजक ही चूल पेटवण्याचेच काम करतात. त्यांच्याही अडचणी आहेत. पण संकटाच्या छाताडावर चालून जा! सरकार तुमचेच आहे. तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. काळजी करू नका, हिंमतीने पुढे जा, तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लघुउद्योजकांना दिला.
मराठवाड्यातील लघुउद्योजकांची संघटना असलेल्या ‘मसिआ’च्या वतीने ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो’ या उद्योग प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी उद्योगजगताशी मोकळा संवाद साधला. लघुउद्योजकांची ताकद पाहून मला मनस्वी आनंद झाला असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, हे ‘मसिहा’च आहेत. शुन्यातून विश्व निर्माण करतात. त्यामुळे त्यांचे हे वैभव पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. अगोदरही उद्योजकांशी बातचीत होत होती. सरकार आमचे ऐकतच नाही, अशी तक्रार उद्योजक करत. परंतु त्यावेळी कोणतेही अधिकार नव्हते. पण हे सरकार तुमचे आहे, तुमच्या हक्काचे आहे. मुख्य म्हणजे पायावर उभे करणारे सरकार आहे, मार्गातले काटे दूर करणारे सरकार आहे.

हिंमत ठेवा, सरकार तुमच्या पाठीशी
अडचणी आहेत, प्रश्न आहेत. पण काळजी करू नका. सरकार प्रत्येक संकटाच्या काळात तुमच्यासोबत आहे. उद्योजक धाडसी असतात. हिंमत, जिद्दीच्या जोरावर नवे विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे अडचणींचा पाढा वाचण्यापेक्षा संकटाच्या छाताडावर चालून जा, भविष्य तुमचेच आहे. या मार्गात तुमच्या वाटेत येणारे अडथळे दूर करण्याची जबाबदारी सरकारची असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिला. मंदी आहे. आहेच. पण म्हणून रडत बसायचे का? जो लढतो, तोच जगतो. हा मंत्र उद्योजकांनी लक्षात ठेवावा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकरी चिंतामुक्त करणारच
शेतकरी हा राज्याचा पोशिंदा आहे. टीचभर पोटासाठी तो निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करतो. त्यालाच आधार दिला नाही तर आपल्याला तरी दोन घास कसे मिळतील. प्रदर्शनातील अन्नप्रक्रिया उद्योगाचा विभाग त्यासाठीच मुद्दाम बघितला. या भागात तेलबियांवरील प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कृषि व उद्योग क्षेत्रांनी हातात हात घालून एकमेकांना आधार दिला तर परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही. मराठवाडा मेहनती आहे. इथल्या मातीला कष्टाचा संस्कार आहे. आपल्याला मेड इन चायना, मेड इन अमेरिका, मेड इन जपानचे फार आकर्षण असते. पण आता ‘मेड इन इंडिया’चा बोलबाला जगभरात झाला पाहिजे अशी भव्यदिव्य कामगिरी करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्योगक्षेत्राला केली.
पारंपरिक चौकटीतून बाहेर पडा
लघुउद्योजक हा उद्योगक्षेत्राचा कणा आहे. पण आपण किती दिवस पारंपरिक उद्योगातच रमणार आहोत. आता ही चौकट ओलांडून बाहेर आले पाहिजे. लघुउद्योजकांची ताकद मोठी आहे. जग जिंकण्याची उर्मी बाळगा. एका स्टॉलवर एलईडी दिवे बघितले. काळोख असलेल्या घरात विकासाचा दिवा लागला पाहिजे. घर पेटवणे सोपे पण त्या घरातील चूल पेटवणे अतिशय अवघड आहे. उद्योजक ही चूल पेटवण्याचेच काम करतात असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, खासदार राजकुमार धूत, इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक, नारायण पवार, अभय हंचनाळ, अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, राजेंंद्र चौधरी, विकास पाटील, अब्दुल शेख, भगवान राऊत आदींची उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय केंद्र, फुडपार्क, कौशल्य विकास संकुल…
मसिआच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. हाच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एक आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यास संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये 500 एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग अर्थात फुडपार्क उभारण्यात येणार असून त्यातील 100 एकर जमीन ही महिलांसाठी राखून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी घोषित केले. 2020 च्या जूनमध्ये या फुडपार्कचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भूमीपुत्रांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास संकुल उभारण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सरकार म्हणून आम्ही हे काम करू पण भूमीपुत्रांना रोजगार देण्याची जबाबदारी उद्योजकांची आहे असेही त्यांनी बजावले.
धाराशिवला टेक्निकल टेक्सटाईल हब
महाराष्ट्राचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. नांदेड येथे कृष्णुर, धाराशिव येथे वडगाव सिद्धेश्वर तसेच संभाजीनगरातील अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक वसाहतींचे काम प्रगतीपथावर आहे. धाराशिव येथे टेक्निकल हब उभारण्यात येणार असून त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.




























































