सैन्य भरतीसाठी 28 हजार उमेदवारांनी दिली आरोग्य चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भरतीसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून, त्यापैकी पाच दिवसात 35 हजार उमेदवार येणे अपेक्षित होते. मात्र 7 हजार जणांनी दांडी मारल्याने 28 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन शारीरिक आरोग्य चाचणी दिली आहे, अशी माहिती सैन्य भरती घेण्यासाठी परभणी येथे आलेल कर्नल विजय पिंगळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर देशाच्या सैन्य दलात भरती होण्यासाठी उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना संधी दिली जात आहे. यामध्ये गेल्या पाच दिवसात 35 हजार पैकी 28 हजार उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या पार पडल्या आहेत.

कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध या मैदानावर सदर सैन्य भरती प्रक्रियेला 4 जानेवारीला सुरुवात झाली. ही प्रक्रिया 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये आतापर्यंत परभणी, बुलढाणा, धुळे, नंदुरबार आणि संभाजीनगर या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधून आलेल्या उमेदवारांच्या आरोग्य तसेच शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. तर पुढील दिवसांमध्ये जळगाव, नांदेड, हिंगोली व जालना जिल्ह्यातील उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.