संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. संभाजीनगरच्या विकासाला प्राधान्य आहे. संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, आवश्यक बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींना दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सिल्लोड येथील पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पूर्णा नदीवरील अतिरिक्त बॅरेजेसबाबत सर्वेक्षण करण्यात येईल. पीक ‍विमा योजनेबाबत काही उणिवा आढळलेल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी कंपनींच्या प्रतिनिधींसोबत लवकरच संवाद साधून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी लवकरच मार्ग काढण्यात येईल.

मराठवाडा विभागातील शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने यासाठी लागणाऱ्या अंदाजे एक हजार 300 कोटी रुपयांच्या निधीसाठी वर्गवारी करून टप्प्याटप्याने कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर शाळांचा विकास करण्यासाठी उद्योजकांच्या सहकार्यातून सीएसआर निधीचा देखील विचार करावा लागेल, यासाठी उद्योजकही पुढे येतील.

पर्यटन, दळणवळणासाठी आवश्यक असणाऱ्या संभाजीनगर- शिर्डी आणि संभाजीनगर-अजिंठा रस्त्याच्या कामांनाही गती देण्यात येईल. लोकप्रतिनिधींनी औद्योगिक विकासासाठी मागणी केलेल्या प्रकल्पांचा विचार करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येईल. संभाजीनगर उद्योग नगरी असल्याने संभाजीनगरातून जाणाऱ्या द्रूतगती मार्गाच्या आजूबाजूस ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर उभारण्याबाबतही विचार करण्यात येईल.

पैठण येथील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आणून पर्यटक, भाविकांसाठी ते खुले करण्याबाबत, दौलताबाद टी पॉइंटजवळ आवश्यक असणारा बायपास रस्ता, औरंगाबादेत प्रस्तावित असलेले 200 खाटांचे महिला व बाल रुग्णालय याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही संभाजीनगरच्या पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या.

बैठकीस उद्योग मंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाषदेसाई, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयोमंत्रीसंदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विविध विभागाचे प्रधान सचिव, सचिव, संभाजीनगर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्रमुख यांची उपस्थिती होती.