
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रस्ताव पारित न केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेस आणि माकपाने कडाडून टीका केली आहे. बंगालमध्ये सत्तारूढ असलेली तृणमूल काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा घणाघात या दोन्ही विरोधी पक्षांनी केला आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेता अब्दुल मन्नान यांनी विधानसभेच्या एकदिवसीय सत्रानंतर तृणमूल काँग्रेसने सीएए विरोधातील प्रस्ताव पारित करण्याच्या मागणीला धुडकावून लावल्याचं म्हटलं होतं. तृणमूल काँग्रेस सीएए आणि एनआरसीला होणारा विरोध गांभीर्याने घेत असेल, तर विधानसभेत विरोधी प्रस्ताव पारित करण्यापासून त्यांना कुणी रोखलं होतं? याचाच अर्थ त्यांचा पक्ष भाजपची बी टीम बनला आहे, अशी टीका मन्नान यांनी केली आहे.
सीएएविरोधी प्रस्तावावर मन्नान यांनी पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष बिमान बंडोपाध्याय यांच्याशी संवाद साधला होता. मात्र, मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी या प्रस्तावावर गेल्या सप्टेंबर महिन्यातच चर्चा केल्याचं बंडोपाध्याय यांनी सांगितलं. पण, सप्टेंबरमध्ये सीएए हा कायदा लागूच झाला नव्हता. त्यामुळे सत्तारुढ पक्षाकडून विधानसभेचा असा वापर यापूर्वी कधीही झाला नव्हता, असा आरोपही मन्नान यांनी केला आहे. दुसरीकडे, माकपा नेता सुजान सिंह चक्रवर्ती यांनीही तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष गुंतवणूक घोटाळ्यात सामील असलेल्या त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका चक्रवर्ती यांनी केली आहे.

























































