
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत. ‘आम्ही 220 पेक्षा जास्त जागा जिंकणार, विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेताच राहणार नाही आणि आता महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही’, असे अंदाज ते वर्तवित आहेत. मात्र, फडणवीस यांचे कोणतेही अंदाज खरे ठरत नसल्यामुळे त्यांनी आता चांगला ज्योतिषी शोधावा, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजपच्या अंतर्गत निवडणुकीबद्दल बोलावं, असं मला वाटत नाही. आता त्यांच्यावर सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्र पाहतो आहे. त्यांची अधोगती आता सुरू झाली आहे , असा थेट आरोप महसूलमंत्री थोरात यांनी केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज नगर येथे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महसूलमंत्र्यांना योग्यवेळी उत्तर देईन – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांचे सगळेच अंदाज चुकत असून, त्यांनी नवीन ज्योतिषी शोधावा, या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला मी योग्यवेळी उत्तर देईन, असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले. संभाजीनगर येथे जाताना फडणवीस यांनी नगर येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली.

























































