जेएनयू हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात, काँग्रेसच्या चौकशी समितीने सादर केला अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनयूतील 5 जानेवारीच्या हल्ल्यामागे मोदी सरकारचाच हात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार हे हल्ल्याचे ‘मास्टरमाइंड’ असून त्यांना तत्काळ हटवा, अशी शिफारस काँग्रेसच्या सत्यसंशोधन समितीने केली आहे. या समितीने रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हल्ल्याचा चौकशी अहवाल सादर केला.

जेएनयू हल्ल्यामागील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव, एनएसयूईचे माजी अध्यक्ष हिबी ईडन, खासदार सय्यद नसीर हुसैन आणि एनएसयूआयच्या माजी अध्यक्षा अमृता धवन या चार सदस्यांची सत्यसंशोधन समिती नेमली होती. या समितीने पाच प्रमुख मुद्दय़ांच्या आधारे निष्कर्ष काढत शिफारसी केल्या आहेत. जेएनयूतील शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान 5 जानेवारीच्या रात्री मास्क लावलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले.

समितीच्या इतर शिफारसी
– हल्ल्याच्या घटनाक्रमाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी, जेणेकरून हल्ल्याची सुरुवात कुठून झाली ते कळेल.
– जेएनयू प्रशासनाने शुल्कवाढ तत्काळ मागे घ्यावी.
– कुलगुरूंविरोधात फौजदारी कारवाई करावी. तसेच त्यांनी 27 जानेवारी 2016 पासून केलेल्या सर्व नियुक्त्या व त्यांनी घेतलेल्या आर्थिक, प्रशासकीय निर्णयांची स्वतंत्र चौकशी व्हावी.
– साबरमती आणि पेरियार हॉस्टेलमधील हल्ल्याच्या कटात मदत करणारे शिक्षक तसेच सुरक्षा कंपनीचीही चौकशी व्हावी. सुरक्षा कंपनीचा करार रद्द करावा.
– तर पोलीस अधिकाऱयांची जबाबदारी निश्चित व्हावी.
– विद्यार्थी संघटनेला अधिकृत शाखेची मान्यता द्यावी, जेणेकरून शुल्क व इतर मुद्दय़ांवर विद्यार्थी व प्रशासनामध्ये विचारविनिमय केला जाऊ शकेल.

एसआयटीचा आणखी सात जणांवर ठपका
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशी घोषसह नऊ जणांवर हल्ल्याचा ठपका ठेवला होता. त्यावेळी संशयितांची रेखाचित्रेही जारी केली. त्यानंतर रविवारी आणखी सात जणांची ओळख पटवल्याचे एसआयटीच्या अधिकाऱयांनी सांगितले.