चिपळूणला एसटी चालक, वाहकाला मारहाण; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील मार्कंडी येथे एसटी बस स्विफ्ट गाडीला घासल्याने याचा राग मनात धरून एसटीचा पाठलाग करून आठजणांनी एसटी मध्यवर्ती आगारात चालक व वाहकास मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी 11.40 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आठजणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार स्वप्नील सुधाकर सावर्डेकर ( वय 35) यांनी दिली आहे. यानुसार रमेश यशवंत पवार, अक्षय रमेश पवार, समीर सुरेश पवार, अशोक यशवंत पवार, उषा अशोक पवार, रोहन रामचंद्र पवार, अंकित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी चालक नितीन कारंडे हे आपल्या ताब्यातील एसटी घेऊन चिपळूणच्या दिशेने येत असताना मार्कंडी येथे आले असता त्यांची बस एका स्विफ्ट गाडीला घासली गेली. याचा राग मनात धरून या आठ जणांनी बसचा पाठलाग करून चिपळूण मध्यवर्ती आगारात स्विफ्ट गाडी व दोन दुचाकींसह आले. यावेळी या आठ लोकांनी एस.टी. चालक नितीन कारंडे व वाहक स्वप्नील सावर्डेकर यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत मारहाण केली. यामध्ये चालक नितीन व वाहक स्वप्नील किरकोळ जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार मध्यवर्ती आगारात घडत असल्याने येथील चालक व वाहक तसेच अधिकाऱ्यांची गर्दी झाली. यानंतर पोलिसांना तात्काळ बोलावण्यात आले. याप्रकरणी रमेश पवार यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी या आठ लोकांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर करीत आहेत.