रस्ते अपघातांचा आलेख घसरता पाहिजे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघाताची डोकेदुखीच आपल्याला नकोय. मग तो कुठल्याही स्वरूपाचा असो, त्यात वाढ नको तर अधोगती झाली पाहिजे. यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मी उपलब्ध करून देतो, पण अपघातांचा आकडा शून्यावर आणायचा असे सांगतानाच रस्ता सुरक्षेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन नियमांचे पालन करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

राज्य सरकारच्या वतीने 31 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते म्हणाले, सुरक्षा सप्ताह, सौजन्य सप्ताहांचे नेहमीच आयोजन केले जाते, पण त्या सप्ताहापुरते सौजन्याने वागायचे आणि सप्ताह संपताच पुन्हा ऐशी की तैशी करायची असे अजिबात होता कामा नये. केवळ सप्ताहापुरते मर्यादित न राहता आयुष्यभर सुरक्षेबाबत जनजागृती सुरू राहिली पाहिजे. वर्ष 2005 मध्ये चीन देशात 94 हजार अपघातांची नोंद होती, तर हिंदुस्थानात हा आकडा 98 हजार होता. तेव्हापासून आतापर्यंत चीनमध्ये अपघातांचा आकडा 45 हजारांपर्यंत घसरला, पण त्याचवेळी आपल्या देशात अपघातांचा आकडा 98 हजारांवरून दीड लाखावर गेला. ही असली प्रगती आपल्याला नकोय. प्रगती असावी पण अपघातांच्या बाबतीत आपली अधोगतीच झाली पाहिजे. अपघातांचा आलेख घसरता ठेवण्यासाठी सरकार म्हणून काही कमी पडू देणार नाही असा शब्द देतानाच सर्वजण एकत्र येऊन ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी एसटी महामंडळ, बेस्ट आणि ठाणे परिवहन विभागातील 25हून अधिक वर्षे विनाअपघात काम करणार्‍या चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाबळेश्वर आणि सह्याद्री ट्रेकर ग्रुपच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार अरविंद सावंत, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने,  बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, मुंबई वाहतूक विभागाचे सहआयुक्त मधुकर पांडये या मान्यवरांबरोबर परिवहन व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या आनंदाचे खरे मानकरी पोलीसच

पोलीस सक्षम आहेत म्हणून आपण आयुष्याचा आनंद लुटत आहोत. आपल्या येथे अनेक सण आहेत. ते सण सर्वजण थाटामाटात साजरे करतात. पण तेव्हाही आमचे पोलीस मात्र खाकी घालून डय़ुटीवर असतात. ते त्यांचे काम चोख बजावतात म्हणून आपण मनमुराद आनंद लुटतो. आपल्या आनंदाचे खरे मानकरी पोलीस आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

अपघातांची संख्या शून्य आणण्यासाठी प्रयत्न करणार

वाहतुकीचे नियम, सूचना व्यवस्थित पाळल्या तर अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. अपघातांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी केवळ कठोर नियम करून चालणार नाही तर सर्वांची साथ पाहिजे असे परिवहन मंत्री अनिल परब यावेळी म्हणाले.

इंटरनेटचा स्पीड वाढू दे पण गाडीचा नको!

आपण फक्त सप्ताहापुरते मर्यादित न राहता वर्षाचे 365 दिवस सतर्क राहिले पाहिजे. सुरक्षेचे पालन दररोज करूया. आता इंटरनेटचा स्पीड 4 जी वरून 5 जी होत आहे. इंटरनेटचा स्पीड वाढत असला तरी वाहनांचा स्पीड वाढता कामा नये. पालिका, नगरपालिकेने  सिग्नल यंत्रणा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता करावी आणि यासाठी सरकारने त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी केले.