जेएनयूशी संबंधित डेटा, फुटेज सुरक्षित ठेवा; हायकोर्टाची गुगल, व्हॉट्सऍपला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराशी संबंधित असलेले सर्व मोबाईल व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर बाबी सुरक्षित ठेवा अशी नोटीस दिल्ली हायकोर्टाने सोमवारी गुगल, व्हॉट्सऍप आणि ऍपलसह दिल्ली पोलीस व राज्य सरकारला बजावली.

जेएनयूमध्ये 5 जानेवारीला झालेल्या या हिंसाचाराचे डेटा सुरक्षित ठेवण्याची मागणी करणारी याचिका जेएनयूमधील अमित परमेश्वरन, अतुल सूद आणि विनायक सावंत या प्राध्यापकांनी केली होती. प्राध्यापकांनी आपल्या याचिकेत व्हॉट्सऍपवरील ग्रुप्स, युनिटी अगेन्स्ट लेफ्ट आणि फ्रंट्स ऑफ आरएसएस यांच्याशी संबंधित लिंक्स आणि इतर पुरावे जपून ठेवण्याची मागणी केली होती.

यावर न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी ‘‘आम्ही जेएनयूकडून सीसीटीव्ही फुटेज मागविले आहेत’’ असे सांगत दिल्ली पोलिसांनीही आपली बाजू मांडली. व्हॉट्सऍप, गुगल, ऍपल आणि दिल्ली पोलीस यांनी याबाबतचे उत्तर मंगळवारपर्यंत द्यावे अशी नोटीस हायकोर्टाने बजावली.

शिक्षकांनो, वर्गात परत या! जेएनयू प्रशासनाचे आवाहन
जेएनयूमधील प्राध्यापकांनी असहकार पुकारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांनी कामावर परत यावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी केले. काम बंद करून केवळ विद्यार्थ्यांचेच नुकसान होईल असे नाही, तर विद्यापीठाचे कामकाज चालवणेही शक्य होणार नाही, असेही प्रशासनाने यावेळी म्हटले. हजारो विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या हिवाळी सत्रासाठी रजिस्ट्रेशन केले आहे, तर काही विद्यार्थी अजूनही रजिस्ट्रेशन करत आहेत. त्यामुळे सर्व वर्गांच्या प्राध्यापकांनी आपले ‘काम बंद’ आंदोलन मागे घेऊन कामावर परत यावे असेही प्रशासनाने म्हटले आहे. हिंसाचाराच्या विरोधात शिक्षकांच्या दोन संघटनांनी एकत्र येऊन काम बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे.

उपकुलगुरू कार्यालयाला जामिया विद्यार्थ्यांचा घेराव
जामिया मिलिया इस्लामियाच्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी उपकुलगुरू नजमा अख्तर यांच्या कार्यालयाला सोमवारी घेराव घातला. गेल्या महिन्यात जेएनयूच्या आवारात झालेल्या हिंसाचारासंदर्भात दिल्ली पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. यासोबतच विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा घ्या आणि विद्यार्थ्यांना पूर्ण संरक्षण द्या अशा आणखीही काही मागण्या यावेळी जामियाच्या विद्यार्थ्यांनी केल्या. कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत उपकुलगुरूंविरुद्ध जोरदार घोषणाही दिल्या. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी ठाण मांडले आणि या मुद्यावर उपकुलगुरू कधी संवाद साधतात याची ते वाट पाहिली.