कामगारांचा मानसिक छळ थांबवा! भारतीय कामगार सेनेची जसलोकवर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जसलोक रुग्णालयातील कामगारांचा मानसिक छळ थांबवा, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करू नये, अन्याय करू नये अशा विविध मागण्यांसाठी आज सोमवारी भारतीय कामगार सेनेच्या वतीने जसलोक रुग्णालयावर धडक देण्यात आली. या दणक्याने हादरलेल्या जसलोक रुग्णालयाच्या व्यवस्थापनेने सर्व मागण्या मान्य केल्या.

एखाद्या कामगाराला काही कारणाने गैरहजर राहावे लागले किंवा कामावर यायला थोडासा उशीर झाला तरीही त्याच्यावर कठोर कारवाई केली जात होती. याच छळवणुकीला कंटाळून तणावाखाली आलेल्या सचिन खरात या कामगाराने आत्महत्या केली होती. खरात याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. खरात कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, खरात यांनी रुग्णालयात सेवा केल्यापासून ते 58 वर्षांपर्यंत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यात यावे अशा मागण्याही करण्यात आल्या.

याबाबतचे लेखी पत्र रुग्णालयाच्या एच. आर. विभागाचे संचालक सुनील करंदीकर यांना देण्यात आले. त्यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग-कोल्हापूर अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक देण्यात आली. या वेळी शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, युनियनचे भापाजी सौंदरवा, सिकंदर आढाव, दिनेश सागठीया, किशोर राठोड, किशोर जोईल, मुकेश राठोड, रवी परमार, किरण गोईल, अशोक धाकडा, केतन जोगडीया, जगदीश सौंदरवा, शिल्पा मकवाना आणि कार्यालयप्रमुख राजेश माजगुणकर उपस्थित होते.