विठुरायाची भुरळ सातासमुद्रापार; भगवी वस्त्र, भव्य गंध, संस्कृत श्लोक म्हणत गोऱ्यांची पंढरपुरात गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्रीविठ्ठलाची ख्याती आता सातासमुद्रापार पोहचली आहे. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी विविध देशातील 50 हून अधिक परदेशी भाविक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले आहेत.

जपान, इंग्लंड, न्यूझीलंड, अमेरिका, जर्मनी, अमेरिका, ब्राझीलसह अनेक देशांतून आलेले हे विदेशी वारकरी भाविकांचा कौतुकाचा विषय झाला आहे. या परदेशी मंडळींनी विठूमाऊलीचे दर्शन घेतल्यानंतर ह.भ.प. मदन महाराज यांच्या काल्याच्या वाड्यात विठ्ठलाचे भजन किर्तन व विष्णुसहस्त्र पठन केले. हे परदेशी भक्त दोन दिवसापासून शहरात दाखल झाले असून संत महिमा जाणून घेत आहेत.

pandharpur-1

परदेशी भाविकांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर प्रथम सावता माळी यांच्या अरण गावाला भेट दिली. त्यांची जिज्ञासू वृत्ती व पूर्णपणे हिंदुस्थानी पोशाखातील वावर कौतुकाचा विषय ठरत आहे. अंगात भगवी वस्त्र, कपाळावर भव्य गंध तर मुखाने सभाईदारपणे संस्कृत श्लोक म्हणणारे परदेशी वारकरी दोन दिवसापासून पंढरीत दिसून येत आहेत. स्थानिकांसह आलेल्या हजारो भाविकांना त्यांच्या विषयी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

pandharpur

पंढरीत इस्कॉनच्या माध्यमातून अनेक परदेशी भक्त येतात. परंतु हे परदेशी स्वामी विश्वानंद यांच्यासह शहरात दाखल झाले होते. मुळचे हिंदुस्थानी असणारे स्वामी विश्वानंद परमहंस हे जर्मनीमध्ये स्थायिक झाले असून बालपणापासून अंगी कृष्णभक्ती असल्याने त्यांनी संन्यास घेतला आहे.

pandharpur4

दोन दिवसापासून हे सर्व परदेशी वारकरी पंढरपूर मुक्कामी असून त्यांनी विठूरायाचे दर्शन घेवून भजन सेवा केले. केवळ दर्शन घेवून न थांबता या जिज्ञासू परदेशी भाविकांनी विठूरायाच्या विविध संतांची माहिती घेतली असून त्यांच्या अभंगाचा अर्थ देखील जाणून घेतला. दरम्यान पंढरपूर नंतर हे सर्व भक्त सज्जनगडला भेट देणार आहेत. त्यांना माहिती देण्यासाठी पुणे येथील एक महिला समन्वयक असून येथील बबन जोशी यांनी मोठे सहकार्य केले.