सोलापूरचे भाजप खासदार डॉ. शिवाचार्य बनावट जात प्रमाणपत्रावरून अडचणीत, हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dr-jaysiddheshwar-swami-vot

लोकसभा निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत सापडले आहेत. बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी खासदार शिवाचार्य यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाती संदर्भात खुलासा करण्यासाठी जात पडताळणी समितीने खासदार डॉ. शिवाचार्य यांना नोटीस बजावली आहे.

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी तथा नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरे मठ यांनी लोकसभा निवडणुकीत गेल्या वर्षी बनावट जात प्रमाणपत्र सादर केले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे, असा आरोप करत अपक्ष उमेदवार व माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली त्यानंतर या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली. सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला या प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या समोर पार पडलेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने सर्व याचिकाकर्त्याना नोटीस बजावन्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जात पडताळणी समितीने डॉ. जयसिद्धेश्वर यांना नोटीस बजावली असून 27 जानेवारी रोजी होणाऱया जात पडताळणी समितीच्या सुनावणीस हजर राहण्याबाबत सूचना केली आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरच हायकोर्टात सुनावणीची शक्यता आहे.