
स्टेट बँक आणि विमा कंपन्यांच्या साटेलोटय़ामुळे सुधागड तालुक्यातील शेकडो शेतकऱयांना दोन वर्षांपासून पीक विम्यातील फुटकी कवडी मिळाली नसल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अस्मानी संकट कोसळूनदेखील अधिकारी कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा करत आहेत. बँक व विमा कंपन्यांच्या या झोलमुळे तालुक्यातील शेतकऱयांचे 58 लाख रुपये लटकले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पीक विम्याचे पैसे न दिल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱयांनी दिला आहे.
सुधागड तालुक्यातील शेतकऱयांनी 2017-18 मध्ये पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत आंबा बागायतदारांनी पैसे भरले होते. मात्र त्यानंतर अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱयांच्या बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनदेखील फुटकी कवडी देण्यात आली नाही. याविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाली येथील शाखेवर तसेच कृषी व तहसील कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱयांना जाब विचारला. त्यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर तसेच शेतकऱयांच्या प्रतिनिधींना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांनी इन्शुरन्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले, तर विमा कंपन्यांच्या अधिकाऱयांनी आम्हाला बँकेने कागदपत्र वेळेत न दिल्याने पैसे देण्यास विलंब होत असल्याचे सांगून हात झटकले.
जिल्हाधिकाऱयांनी घेतले फैलावर
स्टेट बँक व विमा कंपनीच्या उडवाउडवीच्या उत्तरांनी संतप्त झालेल्या शेतकऱयांनी तहसीलदार दिलीप रायन्नवार यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत तहसीलदारांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांना माहिती दिली. शेतकऱयांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकाऱयांनीही तत्काळ बँक व विमा कंपन्यांच्या अधिकाऱयांची बैठक घेत शेतकऱयांना विम्याचे पैसे ताबडतोब देण्याचे आदेश दिले. इतकेच नाही तर एकमेकांकडे बोटे कसली दाखवता, अशी खरडपट्टी काढत फैलावर धरले.
मी पीक विमा 2017 साली भरला. त्यानंतर आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या योजनेचा मला लाभ मिळेल असे वाटले होते, परंतु दोन वर्षे झाली तरी 88 हजार 500 रुपये विम्याची रक्कम मिळाली नाही, असे सदानंद कोंडे या शेतकऱयाने सांगितले.
शेतकऱयांना फेब्रुवारीअखेरपर्यंत जर पैसे मिळाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव स्टेट बँकेसमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी दिली.
































































