
महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएसईसह सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करण्यात यावा. मराठी भाषा दिनापूर्वी सरकारने यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे शिवसेनेने केली आहे.
गुजरात, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी तेथील शाळांत मातृभाषा सक्तीचा कायदा करून प्रादेशिक अस्मिता जपली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व माध्यमांच्या व बोर्डाच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भातील निर्णयाची मराठी भाषा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारीपूर्वी घोषणा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन परिवहन मंत्री अनिल परब व विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी सूचनेद्वारे ही मागणी केली असता विधान परिषदेतील सर्वच सदस्यांनी सकारात्मक पाठिंबा दिला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षणमंत्री, मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावून अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले होते, याकडेही पोतनीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
मराठी अस्मिता जपण्यासाठी सरकार कटिबद्ध
महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती आमदार पोतनीस यांनी दिली.





























































