उपनगरांतील रुग्णालयांत 228 डॉक्टरांची मेगा भरती, पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांवरील ताण लक्षात घेऊन 16 रुग्णालयांत अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील विविध 228 पदांसाठी डॉक्टरांची मेगा भरती केली जाणार आहे. पालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो रुग्णांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळणार असून रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

मुंबई पालिकेची उपनगरात 16 रुग्णालये आहेत. उपनगरातील वाढत्या लोकसंख्येसाठी ही रुग्णालये मोठी आधारस्तंभ आहेत. लहानसहान आजारांपासून मोठय़ा रोगांवरील उपचार या रुग्णालयात होतात. मात्र या रुग्णालयांवर वाढत्या रुग्णांचा ताण असल्यामुळे हजारो रुग्ण रांगेत ताटकळतात. काही उपचाराअभावी परत जातात. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पालिका पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची 228 पदे भरणार आहे.

यात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ (20 पदे), बालरोग चिकित्सा (29), अस्थिव्यंग (15), वैद्यकशास्त्र (49), शल्यचिकित्साशास्त्र (26), बधीरीकरण (89) या विभागांचा समावेश आहे. ही सर्व पदे हंगामी स्वरूपाची आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून आज त्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर अटी, नियम, शर्ती, सूचना या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.