
या वर्षअखेरीस हिंदुस्थानच्या यजमान पदाखाली पार पडणाऱ्या 19व्या शांघाय कोऑपरेशन संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी हिंदुस्थान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देणार आहे. या परिषदेला एससीओचे सदस्य असणाऱ्या पाकिस्तान, हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि चीन, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसह अन्य सदस्य देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कश्मीर प्रश्नाचे टुमणे लावणाऱ्या पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर एससीओसाठी हिंदुस्थान पाकिस्तानी पंतप्रधानांना आवतण देणार का, याकडे जगाचे लक्ष आहे.



























































