हुडहुडी भरणाऱ्या थंडीने मनमाडकर हैराण तापमानाचा पारा 8.5 अंशांवर स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
एवढ्या थंडीत शेकोटीचा मोठा आधार.

गेल्या तीन दिवसांपासून हुडहुडी भरणाऱ्या थंडीने मनमाडकरांना हैराण केले असून तापमानाचा पारा 8.5 अंशांवर स्थिरावला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे मनमाडकरांना दिवसाही थंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या थंडीने जनजीवन विस्कळीत झाले असून सायंकाळी मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम प्रवासावर झाला असून रेल्वे आणि बस स्थानकांत सकाळी शुकशुकाट दिसून येतो. चाकरमान्यांना मात्र या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या तीन दिवसांत शहर आणि परिसराचा तापमानाचा पारा घसरत गेला. यापूर्वी 15 अंश सेल्सिअसवर असलेले तापमान 11.1, 10 आणि सध्या 8.5 अंशांवर स्थिरावले आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे थंडी तीव्रतेने जाणवू लागली आहे. या घसरलेल्या तापमानामुळे पहाटे आणि रात्रीबरोबरच दिवसाही गारठ्याचा अनुभव मिळत असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. पण रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. यंदा उशिराने थंडी सुरू झाली. डिसेंबरच्या मध्यापर्यंत तापमान स्थिर असल्याने मनमाडकरांना गारवा जाणवत नव्हता. त्यानंतर मात्र हळूहळू घसरत्या तापमानाने थंडीचा कडाका जाणवू लागला.

डिसेंबरनंतर थंडीचा जोर अधिकच वाढला. मध्यंतरी तीन-चार दिवस ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले होते, पण मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येपासून वातावरणात गारठा जाणवू लागला आणि सध्या तर हुडहुडी भरणाऱ्या थंडीने मनमाडकरांना बेजार केले आहे. पहाटे आणि रात्री सर्वाधिक थंडी असते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. एरवी गजबजलेल्या रस्त्यांवर रात्री नऊनंतर शुकशुकाट दिसून येतो. बस स्थानकांत आणि रेल्वे स्थानकांतही रात्रीच्या वेळी तुरळक प्रवासी दिसून येतात.