भाई एक ‘बटण’ की पत्ती दे..असे म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थी गोळ्यांचे पाकीट घेऊन निघतात. कॉलेज बुडवून एखादा निर्मनुष्य कोपरा पकडतात. ही पांढरी गोळी तरुण जिभेवर ठेवून गिळतात आणि मग तासन्तास नशेच्या धुंदीत स्वत;ला हरवून बसतात. हे आहे उल्हासनगरातील तरुणाईचे वास्तव. डोके सुन्न करणाऱ्या ‘नायट्रोबेट 10’ गोळ्यांचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे नशेच्या गर्तेत खेचणाऱ्या या बटण विक्रीच्या धंद्याविरोधात शिवसेना मैदानात उतरली असून याप्रकरणी त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.
उल्हासनगरात सीएचएम, आरके तलरेजा, सेवासदन, एसएसटी, न्यू इंग्लिश अशा महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना नशेच्या मार्गावर लोटण्याचा धंदा येथील गल्लीबोळात, झोपडपट्टय़ांमध्ये सुरू आहे. चरस, गांजा, एमडी, पेपर बॉम्ब हे नशेचे पदार्थ चटकन पोलीस व सर्वसामान्यांच्या नजरेला येतात. मात्र औषधांच्या गोळ्यांच्या पाकिटात मिळणारे ‘बटण’ अर्थात ‘नायट्रोबेट 10’ हे सर्वसामान्यांना औषध वाटते. त्यामुळे तरुणाई या ‘बटण’ नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या गोळ्यांवर प्रतिबंध घालून विक्री करणाऱया समाजपंटकांवर कायदेशीर कडक करवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, युवासेनेचे विक्की भुल्लर यांनी उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपविभागप्रमुख प्रमोद पांडे, माजी शिक्षण समिती सभापती नंदू भोसले, शाखाप्रमुख मुकेश जाधव, माजी शाखाप्रमुख अजितसिंग गिल उपस्थित होते.
कारवाईचा फास आवळणार
नशेखोरांच्या मुसक्या आवळून ‘बटण’ विक्रीच्या गोरखधंद्याचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन पोलिसांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीदेखील नशेच्या विरोधात कंबर कसली असून त्यांनी याबाबत पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांची भेट घेऊन या धंद्याचे कंबरडे उद्ध्वस्त करून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईची सुटका करण्याची मागणी केली आहे.























































