मेहेरबाद येथील मेहरबाबा मेमोरियल टॉवरचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवतार मेहेरबाबा यांच्या संकल्पनेतील मेमोरियल टॉवर मेहेराबाद येथे नगर-अरणगाव रस्त्यावर उभारण्यात आले असून त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. आता ते सर्व लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. 23 डिसेंबर 1944 रोजी मेहेरबाबांनी आपले शिष्य मासाजी व चानीजी यांना श्रद्धांजली वाहताना या मनोऱ्याची संकल्पना व्यक्त केली होती. त्याचे प्रत्यक्ष बांधकाम 2009 मध्ये सुरू झाले. मूळचे अमेरिकेतील असलेले मेहेरप्रेमी आर्किटेक्ट टेड जेडसन यांनी या मनोऱ्याचे डिझाईन तयार केले. स्ट्रक्चरल डिझाईन नगरचे विवेक आपटे यांचे असून उभारणीचे काम अभियंते वैभव जोशी व त्यांचे सुपुत्र विक्रम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

या मनोऱ्याची उंची 60 फूट असून ‘रोटेटिंग हायपरबोला’प्रमाणे त्याची रचना करण्यात आली आहे. त्याच्या वरच्या बाजूला चार लोलक असून सूर्यकिरणे त्यातून परावर्तीत होऊन इंद्रधनुष्यातील सात रंगांचे वलय तयार होते. हे विशिष्ट बनावटीचे लोलक चीनमधून मागवण्यात आले आहेत. मनोऱ्याच्या खालील बाजूस मेहेरबाबांनी उल्लेख केलेल्या 354 मेहेरप्रेमींची नावे कोरण्यात आली आहेत. या मनोऱ्याच्या आतील बाजूस दर्जेदार असे स्टील वापरण्यात आले असून त्यावर राजस्थानातील संगमरवराचे आवरण आहे. विशिष्ट पद्धतीने एकमेकांत अडकवून हे दगड बसवण्यात आले आहेत. मनोऱ्याशेजारी असलेल्या कठड्यांना मेहेराबादच्या सर्वधर्मीय बोधचिन्हाचा आकार देण्यात आला असून त्यासाठी नेवासे तालुक्यातील खाणीतील दगड वापरण्यात आले आहेत. हे काम त्रिवेदी अॅड कंपनीने केले आहे. हा मनोरा किमान 700 वर्षे टिकेल, एवढा मजबूत बांधण्यात आला आहे.

मेहेराबादच्या टेकडीवरील अवतार मेहेरबाबांचे समाधीस्थळ, मेहेर रिट्रीट व मेमोरियल टॉवर एका रेषेत आहे. मेहेर रिट्रीटवर सप्तरंगी ध्वज फडकत असतो. मेमोरिअल टॉवरवरील लोलकातूनही सात रंगांची किरणे निघतात. सर्व धर्मांच्या एकात्मतेचा संदेश येथील चिन्हे देतात. रात्रीच्या वेळी प्रकाशझोतांमुळे मनोरा अधिकच वेधक दिसतो. सध्या अनेक लोक, मेहेरप्रेमी हा मनोरा पाहण्यासाठी येत आहेत.