पालिका शाळांच्या 520 इमारतींमध्ये लागणार एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या 520 शाळा इमारतींच्या एण्ट्री-एक्झिटसह चौथी ते सातवीच्या वर्गांमध्ये लवकरच एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. पालिका आयुक्तांनी याला मंजुरी दिली असून लवकरच टेंडर काढणार असल्याची माहिती सहआयुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समिती बैठकीत दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची संकल्पना मांडली होती.

शिक्षण समितीच्या बैठकीत आज शिवसेना नगरसेविका शुभदा गुढेकर यांनी ‘वीर भगतसिंग इंटरनॅशनल स्कूल’विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊनही पालिकेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे उघड केले. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पालिका या शाळांना मान्यता देत असल्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत लक्ष ठेवले पाहिजे, आवश्यक त्या सर्व प्रकरणांत तातडीने कारवाई केली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी मंगेश सातमकर यांनीदेखील वांद्रय़ाच्या खेरवाडी पालिका शाळेतील गंगाप्रसाद तिवारी नावाच्या शिक्षकाकडून सर्व शिक्षकांना अश्लील मेसेज, फोटो पाठवले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय सदस्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. यावेळी साईनाथ दुर्गे यांनी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या योजनेची माहिती देण्याची मागणी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. याच्या अंमलबजावणीसाठी पालिका दिरंगाई का करते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी वांद्रे प्रकरणात संबंधित शिक्षकाला चौकशी करून निलंबित करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील यांनी पालिका शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

असा राबवणार उपक्रम

पालिकेच्या सुमारे 981 शाळांमध्ये 2 लाख 71 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या स्वतःच्या 458 इमारती असून 62 खासगी इमारतीत हे वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सर्व शाळांच्या एण्ट्री-एक्झिट आणि चौथी ते सातवीच्या वर्गात हे सीसीटीव्ही लावण्यात येतील.

‘त्या’ प्रकरणात तातडीने कारवाई

दरम्यान, मालवणी आणि वांद्रे पालिका शाळांमध्ये घडलेल्या प्रकारांची माहिती घेऊन लवकरच कारवाई करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सलील यांनी स्पष्ट केले.

इंग्रजी प्रेझेंटेशन केले बंद

शिक्षण समिती बैठकीत आज स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर सेलकडून प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले होते, मात्र सादरीकरण इंग्रजीतून असल्यामुळे शिवसेनेच्या शुभदा गुढेकर, शीतल म्हात्रे, साईनाथ दुर्गे यांनी आक्षेप घेतला. यावर शिक्षण समिती अध्यक्ष अध्यक्षा अंजली नाईक यांनी सदर सादरीकरण पुढील बैठकीत मराठीत सादर करण्याचे निर्देश दिले.