
बीडमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राम्हण समाजाने धरणे आंदोलन केले. ब्राम्हण समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही प्रमुख मागणी करण्यात आली. यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशीही मागणी ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ब्राम्हण समाज हा उपेक्षित आहे. समाजातील बेरोजगार तरुणांची संख्या वाढते आहे. शिक्षणाचा खर्च देखील न परवडणारा आहे. समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणे आवश्यक आहे असे आंदोलकांनी म्हटले आहे. पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांना दरमहा पाच हजार रूपये अनुदान देण्यात यावं ही मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलकांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना दिले. गेल्यावर्षी ब्राम्हण समाजाच्या मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात पन्नास हजारांपेक्षा जास्त जण सहभागी झाले होते. आंदोलनानंतरही परिस्थितीत बदल पडलेला नाही आणि मागण्याही पूर्ण झालेल्या नाहीत. यामुळे बुधवारी हे आंदोलन करण्यात आलं होतं.




























































