
कल्याण – डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठय़ाचे दर दुपटीने वाढवण्याचा घाट घातला होता. मात्र आज शिवसेनेने स्थायी सभेत दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. शिवसेना सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा खर्च दरवर्षी वाढत असून हा खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचे विविध स्त्राेत शोधण्याऐवजी मालमत्ता आणि पाणी करात वाढ करण्यावरच प्रशासनाची भिस्त राहिली आहे. यामुळे नागरिकांना राहत्या घराचा 71 टक्के तर मालमत्तेपासून भाडे मिळवणाऱया नागरिकांना त्या मालमत्तेचा तब्बल 83 टक्के कर भरावा लागत आहे. याखेरीज अनधिकृत घरांना दुपटीपेक्षा जास्त शास्ती आकारली जात असल्यामुळे पालिकेला मालमत्ता करातून जवळपास 300 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असून यावरच पालिकेची मदार अवलंबून आहे. त्यातच पालिका प्रशासनाने उत्पन्नाचे अन्य स्त्राेत शोधण्याऐवजी पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी घरगुती पाणीपुरवठा आणि टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दरात दुपटीपेक्षा अधिकची वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला होता. यानुसार प्रती एक हजार लिटरचा दर 7 रुपयांवरून 10, चाळीमध्ये शंभरऐवजी 200 रुपये तर टँकरचा दर सातशेऐवजी एक हजार 50 असा प्रस्तावित केला होता. मात्र वामन म्हात्रे, गोरख जाधव, महेश गायकवाड, वरुण पाटील यांनी दरवाढीविरोधात जोरदार हरकत घेतली. 27 गावांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, टँकर मिळत नाहीत, अमृतचे काम ठप्प आहे त्यामुळे याला जबाबदार कोण, असा सवाल सर्वच सदस्यांनी केला. यामुळे सभापती विकास म्हात्रे यांनी दरवाढ फेटाळल्याची घोषणा केली.
प्रामाणिक करदात्यांवर भुर्दंड
चोरीची आणि अनधिकृत पाणी कनेक्शन महापालिकेने शोधून काढावीत व ती रेकॉर्डवर घेऊन त्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याची सूचना वामन म्हात्रे यांनी केली. पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. प्लम्बर बेकायदा जोडण्या देतात. त्यामुळे प्रामाणिक कर भरणाऱया नागरिकांवर भुर्दंड नको, अशी भूमिका घेत विकास म्हात्रे यांनी प्रशासनाला सुनावले.



























































